जागर न्यूज : मस्तीत केलेली एक चूक बत्तीस वर्षाच्या एका तरुणाला भलतीच महागात पडली असून, सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयाने तरुणास तब्बल पंचवीस वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता शिरभाते यांनी तब्बल २५ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. सतीश शिवाजी चव्हाण ( वय ३२, रा. उमरगा, जि. उस्मानाबाद) असे त्या आरोपीचे नाव आहे. फिर्यादी हा पिडीत मुलीचा वडील असून तो उसतोडीचा कामगार म्हणून काम करीत होता. उसतोडीच्या कामाकरिता तो पिडीतेसह वळसंग येथे कुटुंबासमवेत आला होता. आरोपी हा तेथे ट्रॅक्टर चालक म्हणून काम करीत होता. त्याठिकाणी पिडीता व त्याच्यात प्रेमसंबंध जुळले होते. विवाहित असून सुद्धा त्याने त्या अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले होते. या मुलीचा शोध घेतल्यानंतर ती मुलगी आरोपी समवेत आढळून आली. तेव्हा ती सात महिन्यांची गरोदर होती. वळसंग पोलीस ठाण्याचे तपासी अंमलदार यांनी याबाबत गुन्हा नोंद करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
पिडीता ही अल्पवयीन असल्याचे माहित असूनही आरोपीने तिला पळवून नेले. तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले, अपत्य आरोपी व पिडीतेचे असल्याचे डीएनएच्या अहवालाद्वारे व साक्षी पुराव्याद्वारे न्यायालयाच्या निदर्शनास सरकारी वकील अॅड. प्रकाश जन्नू यांनी आणून दिले.सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण ०९ साक्षीदार तपासण्यात आले.(Twenty-five years of imprisonment for the accused) सरकारी वकील अॅड. प्रकाश जन्नू यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरुन विशेष न्यायाधीश कविता शिरभाते यानी आरोपी सतीश शिवाजी चव्हाण यास २५ वर्षे सक्तमजुरीची व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली व दंड न भरल्यास ६ महिने सक्त मजुरीची शिक्षा सुनावली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा