जागर : राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच आता सोलापुरात भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला असून भाजपच्या चार नगरसेवकांनी राजीनामा दिला असून आणखी काही घडामोडी घडण्याचे संकेत स्पष्ट होऊ लागले आहेत.
सोलापूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या चार माजी नगरसेवकांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. हे चारही माजी नगरसेवक आता बीआरएसच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. एवढंच नाही तर भाजपचा माजी सभागृह नेताही काँग्रेसच्या वाटेवर असल्याचं समोर येत आहे.भाजपचे दिवंगत नेते, माजी खासदार लिंगराज वल्याळ यांचे पुत्र, माजी नगरसेवक नागेश वल्याळ, संतोष भोसले, राजश्री चव्हाण आणि जुगनबाई आंबेवाले यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा भाजपचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सोपवला आहे. तर दुसरीकडे भाजपचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. ते काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे भाजपला सोलापूरमध्ये आणखी एक धक्का लागण्याची शक्यता आहे.
गेल्या महिन्यात आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे आपल्या अख्ख्या मंत्रिमंडळासह सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी पंढरपुरात जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेतलं. त्यानंतर पंढरपुरात त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. याच दौऱ्यावेळी राष्ट्रवादीचे नेते भगिरथ भालके यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला.
या दौऱ्यावेळी केसीआर यांनी नागेश वल्याळ, सुरेश पाटील आदींची भेट घेतली होती. त्यांना बीआरएस पक्षात प्रवेश करण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानंतर अखेर यापैकी वल्याळ यांच्यासह इतर तिघा माजी नगरसेवकांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. सुरेश पाटील हेदेखील पक्ष सोडण्याच्या मानसिकतेत आहेत. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. मात्र त्यांच्या पुढील भूमिकेविषयी उत्सुकता वाढली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा