जागर न्यूज : पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील निर्मलकुमार भोसले याने विजयाची पताका फडकावली असून पोलीस उप निरीक्षक पदाच्या खुर्चीवर बसण्याचा मान त्याने मिळवला आहे.
टाकळी येथील निर्मलकुमार सुर्यकांत भोसले याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेमध्ये राज्यामध्ये दुसरा क्रमांक पटकावत घवघवीत यश संपादन केले आहे.निर्मलकुमार याने जिद्द व चिकाटीच्या जोरावर हे यश प्राप्त केले. त्याच्यावर कुटुंबीय, मित्र, आप्त, नातेवाईक व ग्रामस्थांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.निर्मलकुमार याचे शालेय शिक्षण येथील रुक्मिणी विद्यापीठाच्या मातोश्री ईश्वरम्मा प्रशालेमध्ये झाले. तर विवेकवर्धिनी ज्युनिअर कॉलेज पंढरपूर मधून त्याने बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. तदनंतर बारामती येथील शिवनगर विद्या प्रसारक मंडळ येथून बीबीएची पदवी घेतली.
पुणे येथील डी. वाय. पाटील कॉलेजमधून एमबीए पूर्ण केल्यानंतर त्याने काही काळ नोकरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र अपेक्षित नोकरी न मिळाल्याने त्याने एमपीएससी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षेमध्ये निर्मलकुमार पहिल्या प्रयत्नात लेखी परीक्षा पास झाला. मात्र शारीरिक क्षमता चाचणीमध्ये त्याला अपेक्षित गुण न मिळाल्याने यशाने हुलकावणी दिली. मात्र खचून न जाता त्याने पुन्हा जिद्दीने स्पर्धा परीक्षेचा सराव सुरू केला. लेखी परीक्षेचा सराव करण्याबरोबरच फिजिकल फिटनेस वर देखील त्याने खडतर मेहनत घेतली.
मंगळवारी जाहीर झालेल्या एमपीएससी स्पर्धा परीक्षेच्या निकालामध्ये दुसरा क्रमांक पटकावत निर्मलकुमारने पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. आपल्या यशाचे श्रेय त्याने आई राधा, वडील सूर्यकांत, काका शशिकांत व काकी रेखा भोसले यांना दिले आहे. (Success of Nirmal Kumar Bhosle from Takli) तसेच पीएसआय मंगेश वडणे व विक्रीकर निरीक्षक जगन शहाणे यांनी आपणास मोलाचे मार्गदर्शन केल्याचे त्याने आवर्जून नमूद केले. त्याच्या या यशाबद्दल त्याच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
निर्मलकुमार याला स्पर्धा परीक्षेमध्ये ४२५.५० गुण मिळाले आहेत तर पहिल्या क्रमांक पटकावलेल्या उमेदवाराला ४२७ गुण मिळाले आहेत. प्रथम क्रमांक प्राप्त करण्यासाठी निर्मलकुमार याला अवघे दीड गुण कमी पडले आहेत. निवड झालेल्या ५८३ उमेदवारांमध्ये त्यांने दुसरा क्रमांक पटकावला आहे हे विशेष आहे. पहिल्या प्रयत्नात यशाने हुलकावणी दिल्यानंतर दुसऱ्या वेळी खडतर परिश्रम घेतले. परीक्षा झाल्यानंतर टॉप टेन मध्ये येणार ही खात्री होती. मात्र दुसरा क्रमांक मिळाल्याने आनंद द्विगुणीत झाला अशी प्रतिक्रिया निर्मलकुमार भोसले यांनी दिली.
(स्त्रोत : सकाळ )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा