जागर न्यूज : शेतकरी, बागाईतदारांना परराज्यातील काही व्यापारी फसवत असतानाच आता सोलापुरात आडत व्यापाऱ्याची तब्बल एक कोटीची फसवणूक करण्यात आल्याची मोठी घटना समोर आली आहे.
सोलापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील दोन आडत व्यापाऱ्यांना शेतमाल खरेदी करणाऱ्या दोघांनी तब्बल एक कोटी पाच लाख रुपयांचा गंडा घातला आहे. एका प्रकरणात मुजीब निसार अहमद खलिफा या कांदा व्यापाऱ्याला तमिळनाडूतील व्यापाऱ्याने ४८ लाख रुपयास तर नागपूर येथील रवी रामेश्वर याने तूर व्यापारी मनोज हत्ती यांना ५८ लाखांची फसवले आहे. दोन्ही व्यापाऱ्यांनी पोलिसांत धाव घेतली आहे.नागपूर येथील रवी कॉर्पोरेशन लिमिटेड या फर्मचे मालक रवी महादेव रामेश्वर याने विश्वासाने तूर खरेदी केली. पण, त्याचे ५८ लाख ७७ हजार ७९२ रुपये दिलेच नाहीत. या प्रकरणी मनोज राजशेखर हत्ती (रा. सिद्धेश्वर मार्केट यार्ड, सोलापूर) यांनी जेलरोड पोलिसांत फिर्याद दिली. सोलापूर येथील बाजार समितीतून तूर खरेदी करून ती तूर घेतली.
विश्वासाने मनोज ट्रेडर्स या फर्मच्या माध्यमातून रवी रामेश्वर याने तूर घेतलेले पैसे दिलेच नाहीत. ६ फेब्रुवारी २०२१ पासून आजपर्यंत त्याला वेळोवेळी पैसे मागूनही त्याने पैसे दिले नसल्याचेही फिर्यादीत नमूद केले आहे. संशयित आरोपी रवी रामेश्वर याने बॅंक खात्यात बॅलन्स नसतानाही त्याने धनादेश दिला. बॅंकेतून तो धनादेश परत आला. नागपूरला जाऊन त्यांच्याकडे पैसे मागितले. तरीसुद्धा त्याने पैसे दिले नाहीत. रवी रामेश्वरने आपली फसवणूक केल्याचे हत्ती यांनी पोलिसांना सांगितले. सहायक पोलिस निरीक्षक सोनवणे तपास करीत आहेत.
तमिळनाडूतील आर अक्किनेश्वर ऊर्फ अग्नी याने ऑगस्ट २०२१नंतर खरेदी केलेल्या कांद्याचे ४६ लाख ८४ हजार २२९ रुपयांचे बिल दिलेच नाही. या प्रकरणी सोलापूर बाजार समितीतील मुजीब निसार अहमद खलिफा (रा. साखर पेठ) यांनी जेलरोड पोलिसांत फिर्याद दिली आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील प्रसिद्ध कांदा व्यापारी म्हणून खलिफांची ओळख आहे. कांदा खरेदी-विक्रीचा त्यांचा व्यवसाय असून २०१५ पासून ते तमिळनाडूतील आर अक्किनेश्वर ऊर्फ अग्नी यांच्यासोबत कांदा विक्रीचा व्यवहार करतात.
२०१९ ते २०२०पर्यंत त्याने कांदा खरेदी केलेली रक्कम वेळोवेळी जमा केली. त्यामुळे विश्वास संपादन झाला होता. परंतु, ऑगस्ट २०२१ मध्ये खलिफा यांनी सोलापूर बाजार समितीतील साऊथेन रोडवेज ट्रान्सपोर्टचे मालक नूर अन्वर खडके यांच्या ट्रान्सपोर्टद्वारे अग्नी यास तब्बल ४७ लाख रुपयांचा कांदा पाठवला होता. त्यानंतर बिलासाठी खलिफा यांनी वेळोवेळी अग्नीला संपर्क केला. मात्र, त्याने तुम्हाला बिल देणार नाही, काही करायचे ते करा म्हणून सांगितले. त्यामुळे खलिफा यांनी पोलिसांत धाव घेतली. सहायक पोलिस निरीक्षक नीलेश सोनवणे तपास करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा