जागर न्यूज : गरीब आणि गरजू रुग्णासाठी आता मोठा दिलासा लाभणार असून सरकारी रुग्णालयांत आता १५ ऑगस्टपासून मोफत उपचार मिळणार आहेत, सार्वजनिक भागीदारी तत्वावरील रुग्णालयात देखील ही सुविधा मिळणार आहे .
राज्यातील नागरिकांना सर्व शासकीय रुग्णालयांत वैद्यकीय सेवा व विविध चाचण्या मोफत करण्याच्या सरकारने घेतलेल्या निर्णयाची येत्या १५ ऑगस्टपासून अंमलबजावणी केली जाणार आहे. यामुळे आता विनामूल्य उपचार मिळून गरीब, गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. आरोग्याची समस्या मोठी असून रुगणालयात वाढलेली महागाई सामान्य आणि गोरगरीब रुग्णांना न परवडणारी आहे. विविध चाचण्या आणि उपचाराचा खर्च गरीब रुग्णांच्या आवाक्याबाहेर गेला असून, उपचार हा गरिबांसाठी उरलेला नसल्याची परिस्थिती विविध रुग्णालयात दिसत आहे. (Free treatment will be available from the hospital from 15th August) अवास्तव आणि अवाजवी बिले देणे सामान्य रुग्णांना परवडणारे नसते त्यामुळे शासनाच्या या निर्णयाचा मोठा दिलासा सामान्य रुग्णांना मिळणार आहे.
राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकूण २ हजार ४१८ संस्था आहेत. या संस्थांमध्ये वैद्यकीय सेवा, तपासणी, त्याबाबतचे शुल्क घेतले जाते. गरजू, गरीब रुग्णांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने अनेकदा त्यांच्यासाठी हे शुल्कही मोठा भार होते. यामुळे सर्व शासकीय रुग्णालयांत रुग्णांना विनामूल्य सेवा देण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळाने घेतला आहे. देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या निर्णयाची १५ ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनापासूनच अंमलबजावणी केली जाणार आहे. मोफत उपचार देतानाच ते दर्जेदार, सहज व विनाविलंब वैद्यकीय सेवेसह मिळतील, याचीही खबरदारी घेतली जाणार आहे. आयुष्मान भारत योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत सुमारे पाच लाख रुपयांपर्यंतच्या आरोग्य खर्चाची हमी शासनाने घेतली आहे. मात्र, रक्तपुरवठा वगळून शासकीय रुग्णालयातील तपासण्या, उपचार मोफत मिळणार आहेत. तसेच सार्वजनिक भागीदारी तत्त्वावरील वैद्यकीय रुग्णालयातदेखील या सेवेचा लाभ घेता येईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा