जागर न्यूज : सोलापूर जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांना स्वातंत्र्य दिनाची मोठी गिफ्ट मिळणार असून अनेक पोलीस कर्मचारी आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांना पदोन्नती दिली जाणार आहे.
शासकीय सेवेतील प्रत्येकाला नोकरीत बढती मिळावी ही अपेक्षा असते, मागील काही काळापासून शासनाने कालबद्ध पदोन्नतीची योजना देखील राबवली असून सातव्या वेतन आयोगानंतर सेवाकाळात तीन कालबद्ध पदोन्नती देण्याची योजना अमलात आली आहे. त्यामुळे पोलीस शिपाई देखील निवृत्त होताना अधिकारी पदावरून निवृत्त होणे सुलभ झाले आहे. सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील जवळपास २७१ पोलिस नाईक व सहायक पोलिस उपनिरीक्षकांना स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला पदोन्नतीचे मोठे गिफ्ट मिळणार आहे. तर शहर पोलिस दलातील २४ जणांना देखील पदोन्नती मिळणार आहे. ‘डीपीसी’ची (डिपार्टमेंटल प्रमोशन कमिटी) बैठक झाल्यानंतर शहरातील राहिलेल्या अंमलदारांची पदोन्नती होईल. पण, ग्रामीणमधील अंमलदारांना १५ ऑगस्टपासून नेमणूक देखील मिळणार आहे.
पोलिस शिपाई संवर्गातील अंमलदारास कमी कालावधीत पदोन्नतीच्या ३ संधी मिळून अधिकारी पदावरून सेवानिवृत्त होता येईल. पोलिस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी मोठ्या संख्येने मिळाल्याने एकीकडे पोलिस अधिकाऱ्यांची गरज भागणार आहे.तसेच पोलिस दलात पोलिस हवालदार व सहायक पोलिस उपनिरीक्षक या तपासी अंमलदारांच्या संख्येतही भरीव वाढ होईल. (Promotion to Solapur District Rural and City Police) या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पोलिस शिपाई ते सहायक पोलिस उपनिरीक्षक या पदोन्नतीच्या साखळीमधील पोलिस नाईक हे पद आता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
पोलिस शिपाई पदावरील व्यक्तीस पोलिस उपनिरीक्षक पदापर्यंत पोचवणे आणि पर्यायाने पोलिसांचे मनोधैर्य व आत्मबल वाढून त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करण्याच्या हेतूने हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे प्रत्येक पोलिस ठाण्यासाठी मोठ्या संख्येने गुन्ह्यांच्या तपासासाठी अंमलदार मिळणार असून गुन्ह्यांच्या तपासात तसेच दोषसिद्धतेत लक्षणीय वेग येणार आहे. पोलिस शिपायांना त्यांच्या सरासरी ३५ वर्षांच्या सेवाकालावधीत पोलिस उपनिरीक्षक पदावरुन सेवानिवृत्त होता येईल. पोलिस अंमलदारांना पदोन्नती साखळीत पोलिस शिपाई, पोलिस नाईक, पोलिस हवालदार, सहायक पोलिस उपनिरीक्षक अशा तीन पदोन्नतीच्या संधी मिळतात. सर्वसाधारणपणे एका पदावर १० वर्षे पूर्ण झाल्यावर पदोन्नती मिळायला पाहिजे.
पोलिस शिपायांना सर्वसाधारण १२ ते १५ वर्षानंतर पदोन्नती मिळत असल्यामुळे त्यांचे मनोबल कमी होवून त्यांच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम दिसून येतो. तसेच वरच्या श्रेणीतील पदसंख्या कमी असल्याने देखील पदोन्नती वेळेत मिळत नाही. सध्या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदावर ३ वर्ष सेवा पूर्ण होण्याआधीच काहीजण सेवानिवृत्त होतात. काही अंमलदार पोलिस हवालदार पदावरूनच सेवानिवृत्त होतात. अशा अंमलदारांना पोलिस उपनिरीक्षक पदावर पदोन्नतीची संधी मिळत नाही. त्यांना आता या निर्णयाचा मोठा लाभ होणार आहे. ग्रामीण विभागात १९३ पोलीस नाईक यांना बढती मिळणार आहे तर सोलापूर शहरात १६ जणांना याचा लाभ मिळणार आहे. ग्रामीण मधील ७८ एस आय आता पीएसआय होतील तर शहरातील ८ जणांना ही पदोन्नती मिळणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा