जागर न्यूज : अनेक वळणावर गाजलेली अंधेरी पोटनिवडणूक रद्द होण्याची अधिक शक्यता असून एका उमेदवारानेच ही निवडणूक रद्द ठरविण्याची मागणी केली आहे.
अंधेरी पोट निवडणूक काही दिवस वाजत गाजत राहिली, दिवंगत आमदार लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून निवडणूक लढवू इच्छित होत्या परंतु त्यांचा महापालिकेतील राजीनामा मंजूर केला जात नव्हता. अखेरच्या क्षणी उच्च न्यायालयाने दणका दिल्यावर त्यांचा राजीनामा मंजूर केला आणि निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला होता. ऋतुजा लटके यांना दिलेल्या त्रासाची चर्चा महाराष्ट्रात झाली आणि भाजपवर मोठी नाराजी निर्माण झाली. ऋतुजा लटके यांना जेवढा त्रास दिला गेला तेवढीच त्यांची सहानुभूती वाढत गेली. वास्तविक आमदारांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची निवडणूक बिनविरोध करण्याची राज्याची परंपरा होती परंतु भाजपने ही परंपरा या आधीच खंडित केली आहे.
राज्यात एकीकडे शिवसेनेच्या शाखांवरून राजकीय वातावरण तापलं असताना, दुसरीकडे अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे गटाने अंधेरी पोटनिवडणूकीतून जबरदस्तीने माघार घेण्यास भाग पाडले अशी तक्रार अपक्ष उमेदवाराने निवडणूक आयोगाकडे केली होती. या तक्रारीची आता निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके आणि भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांच्यात लढत होणार होती. दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी मोठा गाजावाजा करत उमेदवारी अर्जही दाखल केले होते. मात्र अर्ज दाखल केल्यानंतर भाजपने निवडणुकीत माघार घेतली.
दरम्यान, आता पुन्हा एकदा ही पोटनिवडणूक चर्चेत आली आहे. त्याला कारणही तसंच आहे. या पोटनिवडणुकीसाठी उभा राहिलेल्या एका अपक्ष उमेदवाराने आपल्यावर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा खळबळजनक दावा केला होता. इतकंच नाही तर, निवडणुकीतून माघार घेण्यासाठी ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी मला धमकी दिली आणि जबरदस्तीने निवडणूक प्रक्रियेतून माघार घेण्यास भाग पाडले, त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक प्रक्रिया रद्द करावी, अशी तक्रार मिलिंद कांबळे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती.
दरम्यान, आता निवडणूक आयोगाने मिलिंद कांबळे यांच्या तक्रारीची दखल घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे निवडणूक आयोग आता अंधेरी निवडणुकीसंदर्भात काय निर्णय घेतं याकडेच सर्वांचंच लक्ष लागलं आहे. (Andheri Assembly by-election likely to be cancelled) या सगळ्यामागे पडद्याआड कोण सूत्रे हलवत आहे याबाबत राज्यात पुन्हा चर्चा सुरु झाली असून दिवंगत आमदारांच्या विधवा पत्नीला किती त्रास दिला जाणार आहे असा सवाल देखील विचारला जाऊ लागला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा