जागर न्यूज : सोशल मीडियावरून राजकीय व्यक्तीबद्धल अनेकदा टीका टिपण्णी होत असते परंतु आता राणे कुटुंबाचे चित्र असलेली किरकोळ पैशांची चलने तयार करून ती व्हायरल करण्यात आली आहेत, यामुळे नव्या वादाला तोंड फुटणार असल्याचे दिसत आहे.
सोशल मीडिया हा उपयोगापेक्षा वादासाठीच अधिक वापरला जात असून सतत सायबर पोलिसांकडे तक्रारी दाखल होत आहेत. राजकीय नेत्यांच्या बाबतीत तर हा मीडिया मोठी डोकेदुखी ठरू लागला आहे. सामान्य व्यक्तींपासून राजकीय हेतूने प्रेरित असलेल्या अनेक व्यक्ती या मीडियाचा वापर आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी करीत आहे प्ररान्तु यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या जातात तर कित्येकदा कायदा सुव्यवस्था देखील अडचणीत येण्याची शक्यता निर्माण होत असते. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे दोन चिरंजीव हे सतत वादात असतात आणि आता त्यांच्याबाबतच हा नवा वाद ओढवल्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे.
भारतातल्या चलनी नोटांवर महात्मा गांधीजींचा फोटो आहे. मात्र गांधीजींऐवजी नोटांवर महापुरुषांचे फोटो असावेत या मागणीसाठी अनेक पक्ष सरसावलेत. सर्वात आधी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी नोटांवर गणपती आणि लक्ष्मी असावेत अशी मागणी केली. त्यानंतर वेगवेगळे राजकारणी वेगवेगळी मागणी करु लागले. भाजप नेते राम कदम यांनी नोटांवर स्वातंत्र्यवीर सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो असावेत अशी मागणी करणारं ट्विट केलं. तर भाजप आमदार नितेश राणे यांनी नोटांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावा अशी मागणी केलीय.
नोटांवर फोटोंवरुन राजकीय नौटंकी सुरु असतानाच आता सोशल मीडियावर काही लोकांनी खोडसाळपणा केला आहे. नाण्यांवर राणे कुटुंबाचे फोटो टाकून ते व्हायरल करण्यात आले आहेत. चलनातून बाद झालेल्या २ पैशांच्या नाण्यावर भाजप आमदार नितेश राणे , ५ पैशांच्या नाण्यावर भाजप नेते निलेश राणे आणि २५ पैशांच्या नाण्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे फोटो लावण्यात आले आहेत. अज्ञात व्यक्तीने हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. त्यावर 'हे फायनल करा' असं लिहिण्यात आलं आहे. सोशल मीडियावर हे फोट व्हायरल झाल्यानंतर यावर अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. पण हे फोटो नेमके कुणी तायर केले आणि सोशल मीडियावर व्हायरल केले याबाबत माहिती मिळालेली नाही.
भाजपच्या युवा मोर्चाचे कार्यकर्ते व्हायरल पोस्टविरोधात आक्रमक झाले आहेत. याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. हा प्रकार असंवैधानिक असून खोडसाळपणा करणाऱ्या व्यक्तीला अटक करुन त्याच्याव कारवाई करावी अशी मागणी भाजप युवा मोर्चाने केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा