जागर न्यूज : तंबाखू खाऊन पिचकाऱ्या मारणे आता जिल्हा परिषद शिक्षकांना भलतेच महागात पडणार असून तीन वेळा हा प्रकार आढळला तर थेट निलंबित करण्यात येणार आहे. आधी मोबाईलवर निर्बंध आणले होते आणि आता थुकोजीराव मास्तर गोत्यात येणार आहेत.
जिल्हा परिषद शाळेच्या वर्गात मोबाईल वापरल्यास, शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्यास दोनशे रुपयांचा दंड केला जाणार आहे. शिक्षक व इतर संवर्गातील कर्मचाऱ्यांनी तीन वेळा नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाणार आहे.दंड आकारण्याचे अधिकार मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांना देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतला आहे.सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये संस्कारक्षम व गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून दशसूत्री उपक्रम राबविण्यात येत आहे.
शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन व शालेय वेळेत मोबाईलचा अनावश्यक वापर याचा परिणाम बालमनावर होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. हे टाळण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी हा निर्णय घेतला आहे.वर्गात शिकवत असताना शैक्षणिक कारणाशिवाय इतर कारणास्तव मोबाईल वापरास बंदी घालण्यात आली आहे. शाळा परिसरात शिक्षक, अभ्यागत व पालक यांना गुटखा, मावा, तंबाखू, सिगरेट व तत्सम पदार्थ वापरण्यास अथवा सेवन करण्यास पूर्णपणे बंदी करण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून आकारलेल्या दंडाची रक्कम शाळा सुधारच्या खात्यावर जमा करून ही रक्कम शाळेसाठी वापरली जाणार आहे.
जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी संबंधित मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांच्या लेखी परवानगी परवानगीशिवाय, अत्यावश्यक कामाशिवाय, विनाकारण, विनापरवानगी वरिष्ठ कार्यालयात येऊ नये, असे शिक्षक आल्याचे आढळल्यास त्यांची त्या दिवसाची विनावेतन करून शिस्तभंगांची कारवाई केली जाणार आहे. (Strict restrictions on tobacco consumption) शिक्षकांनी विद्यार्थ्यांसमोर आदर्श शिक्षक आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक आहे. या संदर्भात वारंवार सूचना देण्यात आल्या आहेत. आपण राबवत असलेल्या दशसूत्रीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांची रुजवणूक करावी.सोलापूर जिल्ह्यातील भावी पिढी संस्कारक्षम घडविण्यासाठी शिक्षक व पालक यांचे योगदान आवश्यक आहे असे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा