जागर न्यूज : यंदाच्या पंढरीच्या आषाढी वारीच्या निमित्ताने मंदिर समितीला सहा कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले असून भाविकांनी विठ्ठल रुक्मिणी चरणी मोठ्या भक्तिभावाने हे दान केले आहे.
आषाढी यात्रेसाठी राज्यभरातून अनेक भाविक पंढरपुरात दाखल झाले होते. यात्राकाळात भक्तांनी विठुरायाच्या चरणी भरपूर दान दिलं आहे. आषाढी वारीत विठुरायाच्या भक्तांनी भरभरून दिलेल्या दानामुळे मंदिर समितीला 6 कोटी 27 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 57 लाख 63 हजार रुपयांचं उत्पन्न वाढलं आहे.याशिवाय लाडू प्रसाद विक्रीतून 75 लाख रुपये उत्पन्न मंदिर समितीला मिळालं आहे. या काळात विठ्ठल चरणी 45 लाख 23 हजार रुपये तर रुक्मिणी चरणी 12 लाख 69 हजार रुपये दान केले गेले आहेत. हुंडी पेटीत 1 कोटी 38 लाख रुपये जमा झाले आहेत. तर, सोने चांदीतून 30 लाख रुपये उत्पन्न मिळालं आहे. याशिवाय देणगी पावतीद्वारे 2 कोटी 13 लाखांचं दान मंदिराच्या खजिन्यात जमा झालं आहे.यंदाच्या वारीत 12 ते 15 लाख भाविक पंढरीत दाखल झाले होते. मंदिर समितीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, यात्राकाळात यंदा 6 कोटी 27 लाख 60 हजार 227 रुपये एवढं उत्पन्न जमा झालेलं आहे.
यासोबतच या काळात एसटी महामंडळालाही तब्बल 27 कोटी 88 लाखांचं उत्पन्न मिळालं आहे. आषाढी यात्रेच्या काळात अनेक भाविकांनी विठुरायाच्या भेटीसाठी जाण्याकरता लालपरीने प्रवास केला. 25 जून ते 3 जुलै या कालावधीत राज्याच्या विविध भागातून 17 हजार 500 फेऱ्या वारकऱ्यांसाठी लालपरीने केल्या. या कालावधीत तब्बल 8 लाख 81 हजार वारकऱ्यांनी एसटीने प्रवास केला आहे. महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास करता येत असल्यामुळे यावर्षी महिला अधिक प्रमाणात पंढरीच्या वारीला आलेल्या होत्या, यामुळे राज्य परिवहन महामंडळाला देखील चांगले उत्पन्न मिळाले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा