जागर न्यूज : शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आता २० रुपयांत एक लाखाचा, तर ६२ रुपयांत ५ लाखांचा अपघात विमा संरक्षण मिळणार असून महाराष्ट्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी एक खास विमा योजना जाहीर केली असून शाळकरी आणि पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना लागू असणार आहे. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांच्या एका पालकाला देखील याचा लाभ घेता येईल. याचा प्रीमियम २० रुपयांपासून सुरू होईल. (Students will now get insurance coverage) यामध्ये वैद्यकीय तसेच अपघाती विमा संरक्षण मिळणार आहे.
राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या निर्णयानुसार ही विमा योजना सरकारी किंवा अनुदानित महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना लागू असेल. २० रुपये प्रीमियम भरून एका विद्यार्थ्याला एक लाख रुपयांचे वैयक्तिक अपघाती विमा संरक्षण मिळेल. ही पॉलिसी एका वर्षासाठी लागू असेल. तर ६२ रुपये प्रीमियममध्ये याच कालावधीसाठी पाच लाख रुपयांचे कव्हरेज मिळेल. अपघातानंतर उपचारांसाठी दोन लाख रुपयांपर्यंतचे मेडिकल कव्हरेज हवे असल्यास ४२२ रुपयांचा प्रीमियम भरावा लागेल.
दरम्यान, प्राथमिक विमाधारक सदस्य हा महाराष्ट्राच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत संलग्न, संबद्ध, प्रशासित, वर्गीकृत असलेली महाविद्यालये, संस्था किंवा विद्यापीठांमध्ये शिकणारा असावा. सेकंडरी विमा सदस्य हा विद्यार्थ्याचा शाळा किंवा कॉलेजमधील प्रवेश अर्जावर नोंदणी असलेला पालक असेल.तसेच योजनेसाठी ‘ICICI Lombard’ इन्शुरन्स कंपनी आणि नॅशनल इन्शुरन्स कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. २० आणि ४२२ रुपये प्रीमियम असलेल्या योजना ‘आयसीआयसीआय’च्या असणार आहेत. तर ६२ रुपये प्रीमियम असलेला पाच लाखांचा वैयक्तिक अपघाती विमा नॅचरल इन्शुरन्स कंपनी ऑफर करेल, असेही आदेशात म्हटले आहे.
आत्महत्या, आत्महत्येचा प्रयत्न, गर्भधारणा किंवा बाळंतपण, मोटार रॅली किंवा साहसी खेळांमध्ये सहभाग, गृहयुद्धात सहभाग, नक्षलवादी हल्ला वगळता इतर दहशतवादी हल्ले, दारुच्या प्रभावाखाली झालेली दुर्घटना, ड्रग्ज आणि सायकोट्रॉपिक पदार्थांचे सेवन, विमा लाभार्थीकडून हत्या, न्यूक्लिअर रेडिएशन अशा घटनांमध्ये विद्यार्थ्यांना हे विमा संरक्षण मिळणार नाही, असेही आदेशात नमूद आहे. शासनाने घातलेल्या या मोठ्या निर्णयाचे स्वागत होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा