जागर न्यूज : वाळू तस्करांचा धुमाकूळ पंढरपूर तालुक्यात सुरुच असून त्यांच्यावर करण्यात येत असलेल्या सलग कारवाईमुळे वाळूचोरांना चांगलाच दणका बसला आहे.
अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. तालुक्यात महसूल विभागाच्या भरारी पथकाव्दारे २९ ते ३१ डिसेंबर सलग तीन दिवस धडक कारवाई करत २ तराफा व १७ होड्या नष्ट केल्या असल्याची माहिती तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांनी दिली. सलग होत असलेल्या कारवाईमुळे गौण खनिज चोरांना मोठा हादरा बसला असल्याचे दिसत आहे. तहसीलदार यांच्या आदेशाने सलग तीन दिवस या वाळूचोरांवर कारवाई करण्याचा धडाका लावला गेला आणि वाळू चोरांना पळता भुई थोडी झाली आहे.
वाळूचोरीवर कितीही कारवाया झाल्या तरी या चोऱ्या थांबत नाहीत. आजवर अनेक चोरांना गजाआड करण्यात आले असून काही टोळ्या हद्दपार करण्यात आलेल्या आहेत. भीमा नदी पात्रात होणारा अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी पंढरपूर महसूल विभागाने पथकांची नेमणूक केली आहे. या पथकद्वारे पंढरपूर तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी भरारी पथकांची नेमणूक केली आहे. भीमा नदी पात्रातील मौजे इसबावी, भटुंबरे येथे गुरुवार दि. २९ रोजी अवैध वाळू उपसा करण्यात येत असल्याची माहिती महसूल प्रशासनास मिळाली.त्यानुसार तेथे पथकाने छापा टाकून १ तराफा व ९ होड्या ताब्यात घेऊन नष्ट केल्या आहेत.
शुक्रवार दि. ३० रोजी करण्यात आलेल्या कारवाईत पंढरपूर परिसरात ३ होड्या नष्ट केल्या तर शनिवार दि. ३१ डिसेंबर २०२२ रोजी गोपाळपूर, मुंढेवाडी, देगाव येथे १ तराफा आणि ५ होड्या कारवाईत नष्ट केल्या आहेत. (Consecutive action against sand thieves in Pandharpur taluka) सदर ठिकाणी अवैध वाळू उपसा व वाहतूक सुरु असल्याचे निर्देशनास आले. भरारी पथकाव्दारे सलग तीन दिवस धडक कारवाई केली असल्याने वाळूचोरांत प्रचंड खळबळ उडाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा