जागर न्यूज : यंदाच्या पावसाने अखेरपर्यंत दिलासा दिलाच नाही त्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांसह सोलापूर जिल्ह्यात अनेक गावात पाण्याची टंचाई असून आत्ताच टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात येवू लागला आहे त्यामुळे येणाऱ्या उन्हाळ्यातील परिस्थिती कठीण जाणार असल्याचेच दिसत आहे.
पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला, तरीदेखील राज्यातील धरणातील पाणीसाठा ६० टक्क्यांवर गेलेला नाही. दुसरीकडे पावसाळा अजून संपलेला नसतानाही राज्यातील ३१४ गावांसह ९९२ वाड्या-वस्त्यांवर पाण्यासाठी टॅंकर सुरू आहेत. त्यात सोलापूर जिल्ह्यातील १४ गावे व १२७ वाड्यांवर टॅंकरने पाणी पुरविले जात आहे.पुणे जिल्ह्यातील भीमा खोऱ्यातील पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, विसापूर, चिल्हेवाडी, कासारसाई, मुळशी, टेमघर, खडकवासला, गुंजवणी, वीर व उजनी ही धरणे अजूनही पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत. पुणे, नगर व सोलापूर जिल्ह्याचा आधार असलेले उजनी धरण अद्याप ६० टक्क्यांवरच आहे. यंदा अपेक्षित पाऊस झाला नसल्याने खरीप हंगामात पाणी सोडता आलेले नाही.
१५ ऑक्टोबर २०२३ ते १५ जून २०२४ या आठ महिन्यांचे काटेकोर नियोजन करावे लागणार आहे. शेतीला एक-दोन आवर्तने सोडली जातील, पण पहिले प्राधान्य पिण्यासाठीच असणार आहे. १५ ऑक्टोबरपर्यंतचा पाणीसाठा अंतिम मानून कालवा सल्लागार समितीच्या माध्यमातून धरणातील उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन केले जाणार आहे. शेतीला साधारणत: डिसेंबर-जानेवारीत एक आवर्तन सोडले जाते, पण यंदा हे पाणी फेब्रुवारीअखेरीस सोडले जावू शकते. (Water scarcity in Solapur district) दुसरीकडे मार्च-एप्रिलमधील आवर्तन मे महिन्यात सोडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळा अजून संपलेला नसतानाही शेतकऱ्यांचीही चिंता वाढल्याची सद्य:स्थिती आहे.
सोलापूर, नगर, पुणे, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, सातारा, सांगली, जालना, नाशिक व अकोला या जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत ४५ ते ६५ टक्केच पाऊस झालेला आहे. या जिल्ह्यांना त्यांच्याकडील जलस्त्रोतातील पाणी आगामी आठ महिन्यांपर्यंत वापरायचे आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा तयार करावा लागणार आहे. पावसाची सरासरी कमी असल्याने यंदा उन्हाळ्यात टंचाईचा सामना करावा लागेल, अशी आजची परिस्थिती आहे. येणाऱ्या उन्हाळ्यात पाण्याचे मोठे संकट उभे राहणार असल्याचे दिसत आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा