जागर न्यूज : अवघ्या शंभर रुपयासाठी अल्पवयीन मुलांनी आपल्या मित्राचा कुऱ्हाडीने हात तोडून टाकल्याची एक धक्कादायक घटना नव्या वर्षाच्या निमित्ताने घडली असून पोलिसांनी एकाला अटक केली तर तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
नव्या वर्षाचा जल्लोष करण्याच्या नादात अनेक गैर घटनाही घडत असतात पण ही घटना अनेकांना धक्का देवून गेलेली आहे. दारूच्या नशेत 'हॅपी न्यू इयर' म्हणण्यावरून तसेच शंभर रुपये न दिल्याच्या रागातून तरुणाच्या हातावर कुर्हाडीने वार करून हात मनगटापासून तोडल्याचा प्रकार घडला आहे.पुण्यात चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साई चौकात ही घटना घडली आहे. पंकज तांबोळी असे गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे. पंकज हा सीडॅक एसीटीएस या इन्स्टिट्यूटमध्ये डॅक कोर्स करीत आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी गौरव मानवतकर याला अटक केली असून, त्याच्या तीन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे.
फिर्यादी आशुतोष माने आणि त्याचे मित्र पंकज तांबोळी,साजीद शेख हे खानावळ बंद असल्याने साई चौकातील हॉटेलमध्ये जेवणासाठी आले होते. नववर्षाचे स्वागत करून जेवण झाल्यावर रात्री एकच्या सुमारास ते हॉटेलबाहेर उभे असताना मोटारसायकलवरून दोघे जण आले. ते दारूच्या नशेत जबरदस्तीने 'हॅपी न्यू इयर' म्हणत होते तसेच त्यांनी पंकजकडे जबरदस्तीने शंभर रुपयांची मागणी केली. पंकजने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपींनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.त्यामध्ये एका आरोपीने फोन लावून त्याच्या आणखी साथीदारांना बोलवून घेतले. त्याचे साथीदार आल्यावर पुन्हा वाद झाला.
एका आरोपीने त्याच्या हातातील कुर्हाडीने पंकजचा हात मनगटापासून तोडून टाकला. केवळ शंभर रुपयांसाठी त्यांनी हातच छाटून टाकला असल्याचा प्रकार घडला. घटनेची माहिती मिळताच पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले. त्यांनी हाताचा पंजा एका प्लॅस्टिकच्या पिशवीत भरत त्याला लगेच जवळच्या रुग्णालयात दाखल केले. (A friend cut off a friend's hand for a hundred rupees) त्याच्यावर उपचार सुरू आहे. तर आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा