कोट्याधीश मजूर !
मुंबई : भारतीय जनता पक्षाचे नेते प्रवीण दरेकर यांना मोठा धक्का बसला असून मुंबई बँकेची निवडणूक त्यांनी जिंकली असली तरी सहकार विभागाने त्यांना अपात्र म्हणून घोषित केले आहे.
मुंबई बँकेच्या निवडणुकीत भाजप नेते प्रवीण दरेकर हे बिनविरोध निवडून आले आहेत. त्यांनी निवडणुकीसाठी मजूर विभागातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दरेकर यांच्यासह त्यांचे संपूर्ण पॅनल या निवडणुकीत विजयी झाले पण त्या निकालापूर्वीच राज्याच्या सहकार विभागाने नोटीस देऊन दरेकर हे 'मजूर' आहेत काय ? अशी विचारणा केली होती. त्यावर ते मजूर नसल्याचा अहवाल प्राप्त झाला आणि सहकार विभागाने त्यांना अपात्र घोषित केले. सहकार विभागाने प्रविण दरेकर यांना अपात्र ठरवताना अनेक गोष्टीकडे लक्ष वेधले आहे. मजूर म्हणजे अंगमेहनतीचे आणि शारिरीक श्रमाचे काम करणारी व्यक्ती, तसेच त्याचे उपजिविकेचे मुख्य साधन हे मजुरीच असणार आहे. मात्र, दरेकर यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी उत्पन्नाचे साधन म्हणून स्वतंत्र व्यवसाय असे यावेळी नमूद केले आहे.
भाजप नेते प्रवीण दरेकर यांची मालमत्तासुद्धा २ कोटी ९ लाख रुपये इतकी आहे. त्यांच्या नावावर ९० लाख रुपयांची संपत्ती असल्याचे विधान परिषदेवेळी दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये आहे. शिवाय विधान परिषदेचे सदस्य म्हणून अंदाजे अडीच लाख रुपये मासिक उत्पन्न प्राप्त होत असल्याचे देखील दिसून आल्याने तुम्हाला मजूर म्हणता येणार नाही असेही सहकार विभागाने त्यांच्या आदेशामध्ये स्पष्ट केले आहे. प्रवीण दरेकर याना मजूर प्रवर्गातून अपात्र केले असले तरी ते दुसऱ्या एका प्रवर्गातून बिनविरोध निवडून आलेले आहेत पण शासनाची फसवणूक केल्याचा मुद्दा आता गरम होऊ लागला आहे त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढणार आहेत हे उघड आहे.
मजूर नसताना मजूर प्रवर्गातून निवडणूक हे कायद्याला सोडून आहे, १९९७ पासून मुंबै बँकेवर याच प्रवर्गातून संचालक बनलेल्या दरेकर यांनी मजूर नसतानाही निवडणूक लढवून शासनाची फसवणूक केल्याचेही या निमित्ताने उघड झाले आहे. आमदार म्हणून निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील कोटय़वधींची मालमत्ता तसेच व्यावसायिक म्हणून केलेली नोंद आणि आमदार- विरोधी पक्षनेते म्हणून अडीच लाख रुपये मानधन मिळविणारी व्यक्ती मजूर असूच शकत नाही हेही या आदेशामुळे स्पष्ट झाले आहे.
मुंबै बँकेच्या निवडणुकीत दरेकर यांच्यासह सहकार पॅनेलचा विजय झाला असताना दुसरीकडे प्रवीण दरेकर यांना सहकार विभागाने मजूर म्हणून अपात्र घोषित केले आहे. गेली अनेक वर्षे आमदार असतानाही मजूर असल्याचे भसवून मुंबै बँकेत संचालक म्हणून निवडणूक लढवत होते. ही बँकेची तसेच हजारो ठेवीदारांची फसवणूक असून याप्रकरणी आपण पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करणार असल्याचे आपचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी सांगितले. तर सहकार विभागाच्या आदेशाचा अभ्यास करून आपण कायदेशीर कारवाईसाठी संबंधित ठिकाणी पत्र देऊन मुंबै बँकेतील घोटाळय़ांचा पर्दाफाश करणार असल्याचे कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. या एकंदर प्रकरणात प्रवीण दरेकर यांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचे नेते आणि सरकार यांच्याविरोधात दरेकर हे कायम बोलत असतात आणि भाजपने महाविकास आघाडीने अनेक नेते अडचणीत आणलेले असल्याने हा विषय महाविकास आघाडीकडून ताणला जाणार हे देखील स्पष्ट आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा