लातूर : अवघ्या पंधरा हजार रुपयाच्या मोहासाठी चाकूर तहसीलमधील नायब तहसीलदाराच्या हातात बेड्या पडल्या आणि तुरुंगात जाऊन बसण्याची वेळ आली.
गेल्या सहा महिन्यात अनेक मोठ्या माशांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जाळ्यात पकडले आणि तुरुंगाच्या गजाआड पाठवले आहे पण लाचखोरांची सवय काही केल्या जाताना दिसत नाही. भले मोठे पगार घेत असतानाही चीरीमिरीशिवाय यांची भूक भागत नाही आणि मग तेल गेले आणि तूपही गेले अशी अवस्था पदरात पडत आहे. लाचखोरीत पोलीस आणि महसूल विभाग नेहमीच आघाडीवर राहिले असून सतत पोलीस अथवा महसूल विभागाचे कर्मचारी अधिकारी हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गळाला लागतात. लातूर जिल्ह्यातील चाकूर येथील तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार शेषराव टिपरसे असाच जाळ्यात अडकला आणि थेट तुरुंगात जाऊन बसला.
जमीन मालक आणि बँक यांच्यातील वादात जमीन मालकाकडून पंधरा हजाराची लाच घेताना हा टिपरसे अलगद जाळ्यात अडकला आहे. तक्रारदार यांच्या जमिनीवर आई आणि बहिणीचे हिस्से वाटणी असून, सदर जमिनीवर पूर्वीचे बँकेचे कर्ज आहे. सदर जमिनीवर बँकेचा बोजा असल्यामुळे या जमिनीच्या फेरफारास बँकेमार्फत लेखी अर्ज करून आक्षेप नोंदविण्यात आला होता. सदर आक्षेप अर्जाच्या अनुषंगाने तक्रारदाराच्या बाजूने निकाल देऊन जमिनीच्या व्यवहारात मदत करण्यासाठी येथील नायब तहसीलदार शेषेराव शिवराम टिपरसे यांनी १५ हजार रुपयांच्या लाचेही मागणी जमीन मालकाकडे केली. जमीन मालकाने त्याला लाच देण्याचे मान्य करून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला आणि २७ डिसेंबर रोजी एसीबीकडे तक्रार नोंदविली. त्यानंतर एसीबीने या तक्रारीची पडताळणी केली आणि सापळा लावला. ठरल्याप्रमाणे नायब तहसीलदाराने पंधरा हजाराची लाच घेतली आणि एसीबीच्या पथकाने झडप मारली. पंचांच्या समक्ष त्याला रंगेहात पकडून त्याची रवानगी तुरुंगात केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा