जागर न्यूज : देवाने आपलं काहीतरी भलं करावं म्हणून लोक नवस बोलतात, देवाला साकडे घालतात पण एका वृद्ध शेतकऱ्याने जगाच्या सुखासाठी पदरमोड करून पांडुरंगाच्या चरणी तब्बल एक लाख एक हजार एकशे एक रुपयांची देणगी दिली आहे.
देणगीदार श्री बबन महादेव गोडगे आणि सौ. अवंतिका बबन गोडगे यांचा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला !
आपलं भलं व्हावं, लॉटरी लागावी, मुलांचं लग्नं व्हावं, त्याला नोकरी लागावी अशा अनेक मागण्या करून लोक देवाला संकटात टाकतात. भले भले नवस बोलतात. नवस सायास यावर कुणाचा किती विश्वास हा ज्याचा त्याचा भाग असतो परंतु लोक देवाला साकडे घालतात पण ते आपलं काही कल्याण व्हावं, काही भलं व्हावं यासाठीच असते. इतरांचे कल्याण व्हावे असे आशीर्वाद दिले जातात पण त्यासाठी प्रत्यक्षात आपल्या खिशात कुणी हात घालताना दिसत नाही. अनेक कोट्याधीश पैसा खर्च करून पुण्य मिळविण्याचे देखील प्रयत्न करीत असतात, त्यासाठी विविध उपक्रम देखील राबवतात पण सामान्य शेतकरी करून करून किती आणि काय करणार ? वृद्धावस्थेत सामान्य शेतकरी प्रतिकूल परिस्थितीत जगत असतो पण मोठे मन असलेला माणूस कितीही गरीब असला तरी तो भल्याभल्या श्रीमंतापेक्षा मनाने प्रचंड मोठा असतो हेच अनेकदा पहायला मिळते. असाच एक वृद्ध आणि सामान्य शेतकरी जगावरील संकट टळले म्हणून लाखांची पदरमोड केल्याचे समोर आले आहे.
करमाळा तालुक्यातील पश्चिम सोगाव येथील बबनराव महादेव गोडगे आणि त्यांच्या पत्नी सौ. अवंतिका बबन गोडगे यांनी तब्बल एक लाख एक हजार एकशे अकरा रुपयांची देणगी विठ्ठल मंदिर समितीला दिली आहे. गोडगे यांचे वय ८० - ८५ च्या पुढे गेले आहे. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात त्यांची सगळी जमीन संपादित झाली आणि पर्यायी जमीन म्हणून त्यांना पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथे जमिनीचा छोटासा तुकडा मिळाला आहे. आता तर वयामुळे त्यांना शेती कसणे देखील होत नाही. प्रतिकूल परिस्थितीत आयुष जगलेले बबनराव गोडगे हे काही गर्भ श्रीमंत नाहीत की त्यांचाकडे मोठी संपत्तीही नाही पण त्यांच्याकडे अनमोल किमतीचे मन आहे. यापंढरीच्या पांडूरंगाला देणगी देणारे अनेक आहेत आणि यात सामान्य माणसांची छोटी देणगी देखील प्रचंड मोठे ठरते. कितीतरी सामान्य माणसांनी देवाच्या चरणी आपली पुंजी अर्पण केली आहे. दान करण्यासाठी पैसा नव्हे तर दातृत्व असावे लागते हेच या देणगीतून दिसून आले आहे.
कोरोनामुळे जागतिक पातळीवर मोठे संकट आले आणि अनेकांचे बळी या महामारीने घेतले. आर्थिक गणिते विस्कटून टाकली. कोरोना व्हायरसने प्रत्येकाच्या मनावर भीतीचा मोठा पगडा होता आणि लाटामागून लाटा येत राहिल्या होत्या. कोरोना कधी संपुष्टात येतोय याची प्रत्येकाला प्रतीक्षा होती. अखेर कोरोनाचा प्रभाव कमी झाला आणि जनजीवन पूर्ववत झाले आहे त्यामुळे समाधान व्यक्त होत असतानाच करमाळा तालुक्यातील सोगाव (पश्चिम ) येथील भाविक बबन महादेव गोडगे यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला एक लाख, एक हजार एकशे अकरा रुपयांची देणगी दिली आहे.
कोरोनाचे संकट प्रभावी होते त्यावेळी आपण पंढरीच्या पांडुरंगाला साकडे घातले होते, कोरोनाचे अरिष्ठ दूर केल्यास आपण मोठी देणगी देवू असे बबन गोडगे यांनी पांडुरंगाला विनंती केली होती. आता कोरोनाचे संकट दूर झाल्यामुळे आपण ही देणगी दिली असल्याचे गोडगे यांनी सांगितले. बबन गोडगे हे वयोवृद्ध भाविक असून पुनर्वसित शेतकरी म्हणून ते पंढरपूर तालुक्यात विसावले आहेत. (Donation to Pandharpur Vitthal by Babanrao Godage) जगावरचे संकट दूर केल्याने मोठ्या श्रद्धेने त्यांनी मंदिर समितीला ही देणगी दिली आहे. जेष्ठ पत्रकार आणि चित्रपट अभिनेते अशोक गोडगे आणि पोलीस कर्मचारी सुनील गोडगे यांचे ते वडील आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा