जागर न्यूज : शेतकरी उस उत्पादकांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केल्याने उद्यापासून राज्यात ठिकठिकाणी मंत्र्यांना अडविले जाणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली.
ऊस उत्पादक शेतकरी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करीत असून शासनाने कसलीच दखल घेतली नाही. दोन दिवस उस तोड बंद ठेवून शासनाचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न केले पण शासनाने काहींही निर्णय घेतला नाही दोन दिवस शांततेच्या मार्गाने आंदोलन करू आणि त्यानंतर काय करायचे ते मी सांगतो' असे शेट्टी यांनी काल स्पष्टच सांगितले होते. आज दुपारपर्यंत कोणताही निर्णय नाही घेतला गेला तर या आंदोलनाचा भडका उडेल असा स्पष्ट आणि रोखठोक इशारा शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला असल्याने हे आंदोलन आता वेगळ्या वळणावर पोहोचण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे. दुपारी पुढील आंदोलनाबाबत दिशा ठरविण्यात येणार होती आणि त्याप्रमाणे निर्णय झाला आहे.
साखर कारखान्यांचा एफआरपीचा मुद्दा आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनाची राज्य सरकारने दखल न घेतल्याने उद्यापासून राज्यात मंत्र्यांना अडवणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे. राजू शेट्टी यांनी सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. २५ नोव्हेंबर रोजी चक्का जाम करणार असून राज्यभर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातील जनतेने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असं आवाहनही त्यांनी केले. महाविकास आघाडी आणि या सरकारला अद्दल घडवणार. या दोन्ही सरकारसोबत आमचं काही देणे घेणे नाही. शंभर खोके दिले तरी या पुढे हे सरकार येऊ देणार नाही, असं राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.
गळीत हंगाम सुरु झाल्यापासून ऊस उत्पादक शेतकरी आपल्या मागण्या मांडत आहेत पण शासन आणि साखर कारखाने याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. ऊस दरासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. मागण्या प्रलंबित असतानाच गाळप हंगाम सुरु झाला पण त्यानंतर शेतकरी संघटना आक्रमक होत गेल्या आहेत. (Farmers' organizations will block the ministers) सुरुवातीला वाहतूकदारांना होत जोडून वाहतूक थांबविण्याची विनंती करण्यात आली. त्यानंतर मात्र ऊसाची वाहतूक करणाऱ्या वाहनांची हवा सोडणे, टायर फोडणे असे प्रकार घडू लागले. सांगली भागात तर ट्रॅक्टर पेटवून देण्यात आले आहेत. आता उद्यापासून मंत्र्यांनाच अडविण्याचे आंदोलन हाती घेण्यात येणार असल्याने आंदोलन अधिक उग्र होण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा