जागर न्यूज : वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून एका पोलीस कर्मचाऱ्याने सरकारी रायफलमधून स्वत:वरच गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली असून यामुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
पोलिसांवर कामाचा मोठा ताण असतोच पण अनेकदा वरिष्ठ अधिकारी मानसिक त्रास देतात म्हणून पोलीस कर्मचारी आत्महत्या करीत असल्याच्या काही घटना यापूर्वीही समोर आलेल्या आहेत. आता पुन्हा राहुरी येथे कर्तव्यावर असलेल्या पोलिसाने अत्यंत धक्कादायक कारणाने बंदुकीची गोळी स्वत:वरच झाडून घेतली आहे. राहुरी येथील धरणावर सुरक्षा गार्ड म्हणून तो कार्यरत होता. भाऊसाहेब आघाव नावाच्या ४९ वर्षे वयाच्या पोलीस कर्मचाऱ्याने हे पाउल उचलल्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे तर संबंधित अधिकाऱ्याचे धाबे दणाणले आहेत. सदर पोलीस कर्मचाऱ्याची सुसाईड नोट समोर आली असून यातून अत्यंत धक्कादायक खुलासे झाले असून वरिष्ठ अधिकारी कशा प्रकारे त्रास देत होते याचा पाढाच त्याने वाचला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी धरण परिसरात सुरक्षा गार्ड म्हणून भाऊसाहेब आघाव हे सेवा बजावत होते. तेथे एका खोलीत स्वतःवर गोळी झाडून त्यांनी आत्महत्या केल्याचं प्राथमिक पोलीस तपासात समोर आलं आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तात्काळ घटनास्थळी धाव घेत पुढील सूचना दिल्या. सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
आत्महत्येची घटना घडली तेथे एक सुसाईड नोट आढळून आली असून त्यात अकोले तालुक्यातील राजूर येथे बंदोबस्तासाठी असताना तेथील पोलिसांनी विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केल्याने हतबल झाल्याचं त्यात म्हटलं आहे. अतिरिक्त पोलीस निरिक्षक आणि तीन पोलिसांनी संगनमताने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. अवैध धंदे बंद केल्याने अतिरिक्त पोलीस निरिक्षक यांनी खोटा गुन्हा दाखल केला. तसेच गुन्हा मागे घेण्यासाठी दहा लाखांची मागणी केल्याचा उल्लेख या सुसाईड नोटमध्ये करण्यात आलाय.
आत्महत्येस पोलीस निरीक्षकासह आणखी तीनजण कारणीभूत असल्याच देखील यात नमूद आहे. दरम्यान, मयत भाऊसाहेब यांच्या नातेवाईकांनी राहुरी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत दोषी पोलिसांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. (A policeman committed suicide by shooting himself) पोलीस अधिकारी आणि एका पोलीस कर्मचाऱ्याचं संभाषण व्हायरल झाल असून, त्या ऑडिओ क्लिपमध्ये अधिकारी भाऊसाहेब आघाव यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यासाठी कसा बनाव करत आहेत याचा उल्लेख आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा