जागर न्यूज : शेजाऱ्याचा घरातून वायर टाकून वीज कनेक्शन जोडून घेणे भलतेच महागात पडले असून असे करणाऱ्या एक ग्राहकाच्या विरोधात महावितरणने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
शेजाऱ्याच्या घरातून अथवा दुकानातून विजेची घेतलेली जोडणी ही अनधिकृत आणि बेकायदेदेशीर मानली जाते परंतु गैरसोय टाळण्यासाठी असा प्रकार केला जातो आणि तो अंगलट येत असतो. सोलापुरातील एका ग्राहकाला असे करणे हे अडचणीचे ठरले आहे. हनुमान नगरातील शिकलकर वस्तीत राहणाऱ्या बरबलसिंग लाखनसिंग दुधनी याच्याकडे विजेचे थकीत बिल असल्याने महावितरणकडून त्याचे कनेक्शन कायमचे बंद केले होते. तरीपण, त्याने शेजारच्याकडून वायर टाकून वीज घेतली. त्यामुळे महावितरणचे सहायक अभियंता गणेश कोळी यांनी बरबलसिंग याच्याविरुद्ध सदर बझार पोलिसांत फिर्याद दिली.
महावितरणचे सहायक अभियंता गणेश कोळी हे त्यांचे सहकारी स्वप्नील शेप व समीश कोळी यांच्यासोबत वीजबिल वसुलीसाठी गेले होते. त्यावेळी कायमस्वरूपी वीजबिल न भरल्याने वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांचाही ते शोध घेत होते. हनुमान नगरातील बरबलसिंग याच्याकडे ९ हजार ६१० रुपयांची थकबाकी होती. तडजोडीचे दोन हजार रुपयेही देखील प्रलंबित होते. (Electricity taken from neighbor's house, police action of Mahavitran) वारंवार मागणी करूनही त्याने वीजबिल भरले नाही. तरी पण, बरबलसिंग याने घराशेजारील महावितरणचे ग्राहक कलाकोर त्रिपालसिंग टाक यांच्या घरात काळ्या रंगाच्या इनकमिंग वायर टाकून अनधिकृतपणे वीज जोडणी करून घेतलेले त्यांना दिसून आले. अशा प्रकारे वीज घेणे हे कायद्याने गुन्हा आहे.
महावितरणचे सहायक अभियंता (वॉटर वर्क्स, उपविभाग ब, सोलापूर शहर) कोळी यांनी त्यासंदर्भात चौकशी केली. त्यावेळी बरबलसिंगने महावितरणचे वीजबिल न भरल्याने त्याचे कनेक्शन कायमचे बंद केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर कोळी यांनी थेट सदर बझार पोलिस ठाणे गाठले. बरबलसिंगविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, पोलिस नाईक भोगशेट्टी तपास करीत आहेत. स्वत:च्या मालकीचे घर असतानाही शेजारील व्यक्तीकडून अनधिकृतपणे वायर टाकून सबकनेक्शन घेणे कायद्याने गुन्हा आहे. धोकादायक पद्धतीने कनेक्शन घेता येणार नाही, असा महावितरणचा निकष आहे. पूर्वीचे वीजबिल थकीत ठेवून महावितरणला धोका देत अप्रामाणिकपणे व स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी वीजचोरी केलेल्यांवर गुन्हे दाखल होतात, अशी माहिती अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा