जागर न्यूज: ऊस तोडणी मजुरांना घेवून जाणाऱ्या ट्रॅक्टरला घाटात अपघात होऊन यात एक मुलगा जागीच ठार झाला तर पंधरा मजूर गंभीर जखमी झाले आहेत.
कर्नाटक राज्यातील साखर कारखान्याकडे ऊस तोड कामगार घेऊन निघालेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली अंबाजोगाई येथे मुकुंदराज परिसरातील येल्डा घाटात पलटी झाली. या अपघातात ११ वर्षांचा मुलगा जागीच ठार झाला तर अन्य १५ जण गंभीर जखमी असून एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. रस्त्यावरील खड्ड्यात आदळून ट्रॅक्टर हेडला ट्रॉली जोडणारा रॉड तुटून हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. (One killed, fifteen injured in an accident involving a laborer's vehicle) मजुरांना घेवून जाणाऱ्या दोन वाहनात धडक होऊन नुकताच एक भीषण अपघात झाला होता, त्यापाठोपाठ आता हा आणखी एक अपघात घडला आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील येल्डा आणि परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथील ऊसतोड कामगार सर्व आवश्यक समान, भांडीकुंडी घेऊन ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बसून भल्या पहाटे कर्नाटकातील साखर कारखान्याकडे निघाले होते. ट्रॅक्टर अंबाजोगाई येल्डा मार्गावर असताना सकाळी पावणेसातच्या सुमारास मुकुंदराज परिसरातील बुट्टेनाथ घाटातील एका अवघड वळणावरील खड्ड्यात आदळून ट्रॅक्टर हेडला ट्रॉली जोडणारा रॉड तुटला आणि ट्रॉली पलटी झाली. यामुळे ट्रॉलीत बेसावध बसलेले सर्व महिला, पुरुष, बालके खाली पडले तर काही ट्रॉलीखाली अडकले. या भीषण अपघातात रणजीत अमोल कांबळे (वय 11, रा. येल्डा) या बालकाचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात अनिता बालू पवार (30), अनुजा अमोल कांबळे (7), दादाराव धनू गायकवाड (37), उषा धनंजय गायकवाड (25), आशा बालू माळी (22), कोमल अमोल कांबळे (45) सर्व रा. एलडा ता. अंबाजोगाई, ललिता दशरथ तिकटे (35), महादेव धुराजी मगर (28), सुरेखा सुधाकर गवारे (32), सुधाकर दिगंबर गवारे (35), रुबिन जलील सय्यद (20), अलिदा जलील सय्यद (47), सारिका महादेव मगर (30), आशा बालू माळी (22) मंगेश दशरथ तिकटे (16) आणि धुराजी माणिक मगर (65) सर्वरा. सोनपेठ, जि. परभणी हे 15 जण जखमी झाले. सर्व जखमींवर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमीपैकी ललिता तिकटे या महिलेची प्रकृती चिंताजनक आहे.
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा