जागर न्यूज : राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचे लोण सोलापूर जिल्ह्यातही आले असून मराठा आरक्षणासाठी गटतट विसरुन तरुणाई एकवटली आहे आणि प्रवेशबंदी सोबत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा देखील निर्णय गावकऱ्यानी घेतला आहे .
सकल मराठा क्रांती मोर्चा माढा तालुक्यामध्ये आक्रमक झालेला दिसून येत आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्या सभेनंतर माढा तालुक्यामध्ये मराठा आरक्षणाची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून कुणबी मराठा म्हणून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत भोसरे ग्रामपंचायतने कुठल्याही पुढारी व नेतेमंडळींना राजकीय कार्यक्रम, सभा घेण्यास बंदीचा ठराव पास केला आहे. तरुणाईने पक्ष, राजकीय गट-तट विसरून एकत्र येत हा ठराव केला.
माढा तालुक्यातील भोसरे येथे जय हनुमान मंदिरामध्ये झालेल्या बैठकीमध्ये याची घोषणा करण्यात आली. या ठरावाला अनुमोदक म्हणून रविराज सुरेश बागल, तर सूचक म्हणून सुधीर सर्जेराव बागल या दोघांनी स्वाक्षरी केली आहे. नितीन कुंभार, गणेश बागल यांच्यासह समस्त ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. ठराव सरपंच स्वाती कुंभार, उपसरपंच सुलन बागल, ग्रामपंचायत सदस्य व सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी सर्व ग्रामस्थांच्या वतीने एकमुखाने पास करण्यात आला. यावेळी साडेतीनशे समाजबांधव उपस्थित होते. या बैठकीच्या दरम्यान तरुण मुलांनी शिक्षणामध्ये झालेली वाताहत आणि त्यातील खदखद ही अतिशय तीव्र शब्दांमध्ये बोलून दाखवली.
सरकारला मराठा आरक्षणासाठी एक महिन्याचा वेळ दिला. मराठा समाजाची मागणी ही ओबीसीमधून कुणबी मराठा म्हणून आम्हाला ५० टक्क्यांच्या आत आरक्षण पाहिजे ही आमची मागणी आहे. सरकारने मागणी पूर्ण केली नाही तर आता फक्त गाव बंदी केली आहे, येणाऱ्या काळामध्ये मनोज जरांगे-पाटलांचा आदेश येऊ द्या, मग बघा तालुक्यात नाही जिल्ह्यात नाहीतर राज्यभरामध्ये मंत्र्यांना आणि आमदार, खासदारांना मराठा समाज कुणालाही फिरू देणार नाही.असे मराठा क्रांती म्रोचाचे समन्वयक हर्षल बागल यांनी सांगितले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा