जागर न्यूज : पंढरपूर शहर व तालुक्यामध्ये मिळून एकूण १७७ नवरात्र उत्सव मंडळांनी देवीचे प्रतिष्ठापना केली असून या उत्सवात ध्वनी प्रदूषण न करता आवाजावर मर्यादा ठेवण्याचे आवाहन पोलीस विभागामार्फत करण्यात आले आहे.
आदिमाया, आदिशक्ती दुर्गामातेच्या मूर्तींची पंढरपूर शहर व तालुक्यातील सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळानी रविवारी ‘उदे उदे गं अंबाबाई’च्या जयघोषात आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुका काढून प्रतिष्ठापना केली. घरोघरी करण्यात आलेल्या घटस्थापनेने शारदीय नवरात्र उत्सवास उत्साही वातावरणात प्रारंभ झाला.यंदाच्या शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये पंढरपूर शहरामध्ये ३८ तर तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये एकूण १३९ सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांनी देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांनी तुळजाभवानी आई.उदे उदे ग अंबाबाई... च्या जयघोषात मिरवणुका काढून देवींच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली.
तत्पूर्वी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी देवीच्या तुळजापूर येथील तुळजाभवानी शक्तिस्थळाहून ज्योती आणल्या. नवरात्र उत्सवानिमित्त सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनी विद्युत रोषणाईसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे, तसेच देवी देवतांच्या कथेवर आधारित देखाव्यांचे आयोजन केले आहे, याशिवाय पंढरपूर शहरांमधील सार्वजनिक मंडळ, राजकीय नेते, विविध क्लब यांच्या वतीने नवरात्रीनिमित्त विविध ठिकाणी गरबा, दांडियाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आता आगामी नऊ दिवस संगीताच्या तालावर दांडियाच्या निमित्ताने तरुणाईची पावले थिरकणार आहेत.
गरबा, दांडियाचे कार्यक्रम सुरू होणार असल्याने तरुणाईकडून दांडियाचा सरावही केला जात आहे. मातोश्री सखुबाई कन्या प्रशालेची पन्नास वर्षाहून अधिक देवीची प्रतिष्ठापना: गाडगे महाराज मिशन मुंबई संचलित मातोश्री सखुबाई कन्या प्रशाला पंढरपूर या प्रशालेच्या वतीने १९६५ सालापासून देवीच्या मूर्तीचे प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. सुमारे पन्नास वर्षांहून अधिक ही परंपरा सुरू आहे. याही वर्षी प्रशालेच्या शंभरहून अधिक विद्यार्थिनीनी पारंपरिक वेशभूषा परिधान करीत लेझीम, टिपरी, टाळ व नृत्य करीत प्रतिष्ठापणे पूर्वी देवीची मूर्तीची पंढरपूर शहरांमधून मिरवणूक काढली. ही मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा