जागर न्यूज : सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली एमआयडीसीत चालत असलेल्या एका काळ्या कारभाराने मुंबई पोलिसांचेही लक्ष विचलित केले असून या कारखान्यात मेफेड्रोन ड्रग्ज चा एकूण ११६ कोटींचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सुरुवातीला १६ कोटींचे ड्रग्ज पोलिसांना मिळाले होते.
सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली एमआयडीसीत चालत असलेल्या एका केमिकल कारखान्यात चक्क ड्रग बनविण्याचा काळा धंदा सुरु होता. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या काळ्या कारभाराचा पर्दाफाश केला आहे. या कारखान्यावर धडक कारवाई करीत सील ठोकले आहे. मुंबईत १६ कोटींचे मेफेड्रोन ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या सोलापूरच्या दोघांना या पथकाने जेरबंद केल्यानंतर सोलापुरातील छाप्यात हा मुद्देमाल ११६ कोटींवर गेला आहे. या पथकाचे प्रमुख तथा एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
अंमली पदार्थाच्या वाढत्या गुन्हेगारीस आळा घालण्याकरिता मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करीत असताना खार पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन इसम मेफेड्रोन (एमडी ) या अंमली पदार्थाचा मोठा साठा घेवून येणार असल्याची खबर गुन्हा अन्वेषण विभाग, मुंबईचे प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक यांना मिळाली. या माहितीची खातरजमा केल्यानंतर कक्ष ९ च्या पथकाने मुंबईतील खार (प.) येथील खारदांडाच्या स्मशानभूमीच्या बाजूला असलेल्या खळा मैदान येथे सापळा रचून दोघांना शिताफीने ताब्यात घेतले.
ताब्यातील एकाकडून एकूण पाच कोटी नऊ लाख ४० हजारांचे दोन किलो ५४७ ग्रॅम एम.डी., दुसऱ्याकडून पाच कोटी आठ लाख ४० हजारांचे दोन किलो ५४२ ग्रॅम एम.डी. मिळाले. दोन्ही ड्राग्जची आंतरराष्ट्रीय बाजरातील मूल्य दहा कोटी १७ लाख ८० हजार रूपये आहे. शासनाने बंदी घातलेल्या या अंमली पदार्थाचा साठा जप्त करून दोघांविरुद्ध खार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपासादरम्यान अटकेतील दोघांकडे सोलापुरातील चिंचोळी एमआयडीसीतील एका कंपनीत आणखी मेफेड्रोन असल्याची माहिती मिळाली. (Mumbai police action on drug manufacturing factory) तेथील छाप्यात तीन किलो तयार मेफेड्रोन मिळून आले. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सहा कोटी एक लाख २० हजार आहे. चिंचोळीतील कारखान्यात शंभर कोटींचे ५० ते ६० किलो मेफेड्रोन (कच्चे) आढळून आले. ते पोलिसांनी जप्त केले. त्यांची फॅक्टरी मुंबईच्या पोलिसांनी कायदेशीर बाबींची पूर्तता करून सील करण्यात आली आहे.
एकूण तपासात अद्यापपर्यंत अटकेतील दोघांकडून तसेच त्यांच्या सोलापूर येथील कंपनीमधून १६ कोटी १९ लाख किंमतीचे आठ किलो तयार मेफेड्रोन (एमडी) व अंदाने शंभर कोटींचा सुमारे ५० ते ६० किलो निर्माणाधिन मेफेड्रोन (एमडी)चा मिळून आले. राहूल व अतुल गवळी हे चिंचोळी एमआयडीसीत सेन्की नामक केमिकल फॅक्टरी चालवित होते. त्यासाठी त्यांनी कारखान्याच्या मालकाकडून दरमहा तीस हजारांच्या भाड्याने कारखाना घेतला होता. त्यातील दोन हजार चौरस फूट जागेत प्रयोगशाळा होती. उर्वरित २१ हजार चौरस फुट जागेत कच्चे केमिकल ठेवले होते. या व्यवसायात त्यांना नुकसान आल्याने त्यांनी ड्रगमधून पैसा मिळविण्यासाटी शक्कल लढविली. त्यातून ते अडचणीत आले. सोलापूर जिल्ह्यात एवढा मोठा काळा धंदा चालत होता हे ऐकून देखील अनेकांना धक्का बसला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा