जागर न्यूज : शेतकरी पाण्यासाठी टाहो फोडत असतांना नीरा कालव्यातून पाणी सोडण्यात आले आणि पाण्यापेक्षा आगामी निवडणुकीचीच चर्चा होऊ लागली आहे.
पावसाने दगा तर दिलाच पण पिकेही हाताची जाऊ लागल्यामुळे, आणि राजकीय नेत्यांची उदासीनता अधिकच भर घालू लागल्याने शेतकरी नाराज असतानाच नीरा कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. नीरा उजवा कालव्याच्या मैल 93 ला अखेर पाणी सोडल्याने शेतकरी आनंदित झाला आहे. 'टेल टू हेड' हक्काचे पाणी नियमानुसार न सोडल्यामुळे येथील शेतकरी शेतकऱ्यांनी आंदोलने केली होती. नीरा उजवा कालव्याचे पाणी नियमानुसार 'टेल टू हेड' देणे बंधनकारक असताना पाण्यामध्येच राजकारण सुरू झाल्यामुळे या कालव्यावरील मैल 93 ला शेवटच्या गावांना वेळेवर पाणी देण्यात आले नव्हते. यामुळे या लाभक्षेत्रातील शेतकरी पाण्याच्या अन्यायाविरोधात चांगलाच आक्रमक झाला होता. आमच्या हक्काचे पाणी जातंय तरी कुठे ? पाण्यासाठी आम्ही संघर्ष अजून किती वर्षे करावा लागणार ? असे प्रश्न शेतकरी उपस्थित करीत होते.
या हक्काच्या पाण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी नीरा उजवा पाटबंधारेच्या पंढरपूर उपविभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलने केली होती. सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील व माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या पाण्यासाठी चांगलेच लक्ष दिले होते. परंतु असे असतानाही शेतकऱ्यांना वेळेवर 'टेल टू हेड' पाणी मिळाले नव्हते. उशिरा का होईना या लाभक्षेत्रातील शेवटच्या गावांना सध्या पाणी सुरू झाल्याने येथील शेतकरी सुखावला आहे. नियमानुसार उशिरा पाणी मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याने या नुकसानीची भरपाई देणार तरी कोण ? असे शेतकरी बोलत आहेत.या कालव्याच्या फाट्यांच्या अधिकाऱ्यांनी नियमानुसार पाणी का दिले नाही याबाबत काही शेतकरी सध्या न्यायालयात दाद मागणार असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
नीरा उजवा कालव्याच्या मैल 93 वरील सांगोला तालुक्यातील शेवटच्या गावांना नियमानुसार हक्काचे पाणी मिळाले नाही. कालव्याच्या शेवटच्या फाट्यांचे अस्तरीकरण झाले तरीहा वेळेवर पाणी मिळत नाही. थोडे दिवस चालणाऱ्या या फाट्यांचे अस्तरीकरण होते मात्र कायमस्वरूपी वाहणाऱ्या कॅनॉलचे अस्तरीकरणाला विरोध होतो याबाबत कोणीच बोलत नव्हते. नियमानुसार हक्काचे पाणी न मिळालेल्या लाभक्षेत्रातील शेतकरी आंदोलनस्थळीच 'आता येवू द्या निवडणूका ! आमचे पाणी जातंय तरी कुठे ? याबाबत निश्चितपणे जाब विचारु. आज वेळ आमच्यावर आली आहे तुमच्यावरही येईल' असे बोलले होते. गेला महिनाभर नीरा उजवा कालव्याच्या पाण्यावरून आगामी निवडणूकीची चर्चा मात्र जोरात रंगत आहे.
निरा उजवा कालव्याच्या फाट्यांचा 'टेल टू हेड' पाणी देणे बंधनकारक आहे. सांगोला तालुक्यात नीरा उजव्या कालव्याचे येणारे पाणी हे अनेक वेळा कमी दाबाने येत असून 'टेल टू हेड'प्रमाणे वाटप होत नाही. (Water released from Neera canal, talk of politics) यापुढे निरा उजवा कालव्याचे हक्काचे पाणी नियमानुसार वेळेवर मिळावे अशी या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांची मागणी आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा