जागर न्यूज : पंढरपूर तालुक्यात पुन्हा एकदा एक वेगळीच दहशत पसरली असून नागरिकात भीतीयुक्त वातावरण असल्याचे दिसून येत आहे. हिंस्र प्राणी शिकार तर करीत आहे पण हा कोणता प्राणी आहे याबाबत सर्वांनाच प्रश्न पडला आहे, त्यामुळे ही भीती अधिक वाढली आहे.
सोलापूर जिल्ह्यात अधूनमधून बिबट्याची चर्चा होत असते, बिबट्या असेल अथवा नसेल पण त्याची दहशत शेतकऱ्यांच्या मनावर कायम असते. पिकात शिकार केल्याचे तर दिसून येते पण प्रत्यक्षात हा हिंस्र प्राणी नजरेला पडत नसल्यामुळे भीतीचा अधिक पगडा नागरिकांच्या मानगुटीवर बसत आहे. पंढरपूर तालुक्यातील सरकोली परिसरात गेल्या चार पाच दिवसापासून असेच चित्र असून, हिंस्र प्राणी शिकार तर करीत आहे पण तो कुणाच्या नजरेस पडलेला नाही. यामुळे घबराटीचे वातावरण सरकोली परिसरात दिसून येत आहे. येथे गेल्या चार दिवसांपासून हिंस्र प्राण्याने दहशत पसरली आहे. आतापर्यंत त्याने २ शेळ्या, १ रेडी, पाच कुत्री यासह एका कोल्ह्याचा फडशा पाडल्याचे समोर आले आहे. यामुळे सरकोली, ओझेवाडी शिवारात नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
चार दिवसांपूर्वी सरकोली येथील संभाजी कोंडीबा पाटील यांच्या दोन शेळ्यांचा फडशा पाडला आहे. पप्पू माने यांचे म्हशीचे रेडकू, सोमवारी पहाटे ओझेवाडी शिवारातील विठ्ठल दत्तू भोसले यांच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला केला. यात त्या कुत्र्याचे केवळ पाय शिल्लक राहिल्याचे पाहावयास असल्याचे मिळाले. त्याचप्रमाणे उसामध्ये असणाऱ्या एका कोल्ह्याचाही त्या हिंस्र प्राण्याने फडशा पाडला असून, त्याच्या पाऊलखुणा सरकोली, ओझेवाडी परिसरात दिसून येत असल्याचे मोहन भोसले यांनी सांगितले. (Fear of wild animals in Pandharpur taluka) वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच पाहणी केली असून, सदरचा हिंस्र प्राणी रातोरात जागा बदलत सांगितले. त्यामुळे सरकोली, ओझेवाडी शिवारातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिकार थांबत नाही किंवा प्राणी नजरेस पडत नाही तोपर्यंत ही भीती वाढत जाण्याची शक्यता आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा