जागर न्यूज : कर न भरल्यामुळे जप्त करण्यात आलेल्या गाड्यांचा आता लिलाव केला जाणार असून अशा २५ वाहनांचा लिलाव सोलापूर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने जाहीर केला आहे.
वाहनांसंबंधी विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर वाहतूक पोलीस आणि उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कारवाई करीत असतात. नियमांचे उल्लंघन केल्यानंतर काही दंड भरून वाहन सोडले जाते. मोटार वाहन अधिनियमानुसार मोटार वाहन कर भरणे अनिवार्य असते परंतु अनेक वाहन मालक अशा प्रकारचा कर भरीत नाहीत . कर न भरलेली वाहने उप प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) यांच्याकडून जप्त केली जातात. सोलापूर जिल्ह्यातील अशीच जप्त केलेली वाहने आता थेट लिलावात काढण्यात आली असून या वाहनांचा ई लिलाव केला जाणार आहे. २१ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते सायं. ६ पर्यंत हा लिलाव सोलापूर उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे होणार आहे. याबाबतची माहिती परिवहन कार्यालयाने दिली आहे.
जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये बस, ट्रक, डी व्हॅन, पिकअप व्हॅन, टूरिस्ट टॅक्सी, जेसीबी यांचा समावेश आहे. वाहनांच्या मालकांना थकीत कर भरणा कळविण्यात आल्यानंतर देखील वाहन मालकांनी कर भरलेला नाही. अशा वाहनांचा ई-लिलाव करण्यात येत आहे. वाहन मालकांना लिलावाच्या तारखेपर्यंत कर भरण्याची संधी राहील. लिलाव होणाऱ्या वाहनांची यादी सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे कार्यालयाच्या सूचना फलकावर जनतेच्या माहितीसाठी प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सविस्तर माहितीसाठी संबंधित व्यक्तींनी कार्यालयाशी संपर्क साधावा. लिलावाच्या अटी लिलावाच्या अगोदर ऑनलाइन प्रसिद्ध करण्यात येणार असून, इच्छुकांनी भाग घ्यावा, असे आवाहन सोलापूरच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी केले आहे.
ही पूर्तता आवश्यक !
सोलापूर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात होणाऱ्या जाहीर ई-लिलावात सहभागी होण्यासाठी १२ ते १९ सप्टेंबर या कालावधीमध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूर येथे खटला विभागात सकाळी ११ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रत्येक वाहनासाठी ५० हजार रुपये रकमेचा डीवाय आरटीओ, सोलापूर नावाने अनामत रकमेच्या डिमांड ड्राफ्टसह ऑनलाइन दिलेल्या कागदपत्रांच्या प्रती, नाव नोंदणी करणे व कागदपत्रे पडताळणी, अप्रुव्हल करून घेणे गरजेचे आहे. कर भरणे तळलेल्या वाहन मालकांना आता आपल्या गाड्यांना मुकावे लागणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा