जागर न्यूज : सोलापूर जिल्ह्यातील सहा तालुके कोरोनामुक्त झाले असून कोरोनाची तिसरी लाट देखील आता परतीच्या प्रवासाला लागली आहे.
कोरोनाच्या पहिल्या दोन लाटांनी माणसांचे जगणे आणि मरणेही कठीण करून टाकले होते. जवळची अनेक धडधाकट माणसे या कोरोनाने हिरावून नेली आहेत तर उद्योग व्यवसायाची चाके कोरोनाच्या गाळात रुतून बसली. दुसरी लाट संपतेय तोच चोरपावलाने कोरोनाची तिसरी लाट आली आणि पुन्हा भीती निर्माण झाली होती परंतु कोरोनाच्या पहिल्या दोन लाटाएवढे नुकसान या तिसऱ्या लाटेने केले नाही. आता ही तिसरी लाट देखील परतीच्या मार्गाला लागली आहे आणि सोलापूर जिल्हाही कोरोनामुक्त होण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. सोलापूर जिल्ह्यातील सहा तालुके पूर्णपणे कोरोनामुक्त झालेले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोला, मोहोळ, अक्कलकोट, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर हे सहा तालुके कोरोनामुक्त झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यात आता केवळ ४५ रुग्ण असून नव्या रुग्णांची सख्या पूर्ण मंदावली आहे. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १० महिला व चार पुरुष उपचार घेत आहेत. शहरात कोरोना झालेल्या ३१ व्यक्ती असून त्यात १७ महिला व १४ पुरुष आहेत. (Six talukas including Pandharpur became corona free) कोरोनाची बाधा झाली तरी आता रुग्ण पाच ते सहा दिवसात बरे होत असून त्यांना फारशी लक्षणेही जाणवत नसल्याचे दिसून येत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा व माढा तालुक्यात प्रत्येकी दोन रुग्ण आहेत. तर मंगळवेढ्यात चार रुग्ण आहेत. बार्शी व माळशिरस तालुक्यात प्रत्येकी तीन रुग्ण सक्रीय आहेत. बार्शी व करमाळा ग्रामीणमध्ये तर माढा, माळशिरस शहरात कोरोनाचा एकही रुग्ण नाही. सक्रीय रुग्णांची संख्या अगदीच नगण्य उरल्याने येत्या काही दिवसात हे तालुकेही कोरोनामुक्त होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील २ लाख २१ हजार ६५६ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली होती. त्यात पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत बाधित व मृतांची संख्या अधिक होती.
लसीकरणाने अत्यंत महत्वाची भूमिका बजावली आणि लसीकरण झाल्यावर कोरोना बाधितांच्या आणि मृतांच्या संख्येत मोठी घट होत गेली. आता तर जिल्हा कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर उभा आहे. पाच तालुक्यात मिळून चौदा रुग्ण सक्रीय आहेत. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या मोठ्या प्रमाणात घटली असून गेल्या दोन महिन्यात सोलापूर जिल्ह्यात कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही ही मोठी दिलासादायक बाब आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा