जागर न्यूज : जगाला हैराण केलेल्या कोरोना महामारीचा अंत जवळ आल्याची आशा जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख डॉ. टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी केली असून हा एक मोठा दिलासा मानला जात आहे.
संपूर्ण जगात हाहा:कार माजवलेल्या कोरोना महामारीने माणसांचे जगणे आणि मारणेही कठीण करून टाकले होते. वेगाने सुरु असलेली प्रगती तर ठप्प झालीच पण धडधाकट माणसानाही या कोरोनाने हिरावून नेले. अवघी दुनिया घरात बंदिस्त करण्याचे काम या कोरोनाने केले आणि त्यामुळे अर्थचक्र कोरोनाच्या गाळात रुतून बसले. उद्योग व्यवसाय ठप्प झाले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आणि जगाला कित्येक वर्षे मागे नेण्याचे काम या कोरोनाने केले. लॉकडाऊन आणि निर्बंध पाळता पाळता लोक मेटाकुटीला आले. एकामागून एक लाट येत राहिल्या आणि तिसऱ्या लाटेच्या पाठोपाठ किंवा थोडासा कालावधी गेल्यावर आणखी चौथी लाट येतेय की काय अशी भीती होतीच पण आता ही भीती देखील संपण्याच्या मार्गावर आली आहे.
कोरोनाने आत्तापर्यंत जागतिक पातळीवर ६५ लाखाहून अधिक लोकांचा बळी घेतला असून या कोरोनाचा सामना करण्यासाठी सुरु असलेले प्रयत्न सर्व देशांनी असेच सुरु ठेवावेत असे आवाहन करून जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) प्रमुखांनी कोरोना महामारीचा अंत होण्याची वेळ आता जवळ आली आहे' असे म्हटले आहे. कोरोना महामारीला तीन वर्षे पूर्ण होत आली असून या पार्श्वभूमीवर हा मोठा आशावाद असून यामुळे जगाला चांगलाच दिलासा लाभणार आहे. 'आम्ही कोरोना महामारीचा अंत करण्यासाठी कधीही चांगल्या वेळेत नव्हतो. अजूनही अंताच्याजवळ नाही, पण शेवट जवळ आला आहे. या संधीचा वापर करण्यासाठी जगाने पावले उचलण्याची गरज आहे. जर आपण आता या संधीचा फायदा घेतला नाही, तर अधिक धोका आहे,असेही डॉ. टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी सांगितले आहे.
२०१९ वर्षाच्या शेवटच्या दिवसात चीनमध्ये पहिल्यांदा कोरोना व्हायरसला सुरूवात झाली. तेव्हापासून आता WHO च्या प्रमुखांनी आशावादी विधान केले आहे. गेल्या आठवड्यात जागतिक स्तरावर नोंद केलेल्या रुग्णांची संख्या मार्च २०२० नंतरच्या सर्वात कमी झाली आहे. कोविड-19 वरील WHO च्या ताज्या अहवालानुसार, ११ सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात जगभरात नोंदलेल्या कोरोना संसर्गाच्या नवीन रुग्णांची संख्या २८ टक्क्यांनी घटून ३१ लाखांवर आली आहे. (The end of the Corona epidemic is near But) याआधी एक आठवडापूर्वी १२ टक्क्यांनी घसरला होता. कोरोनाच प्रभाव आता सगळीकडेच कमी झाला आहे आणि जनजीवन पूर्वपदावर आले आहे. त्यात हा एक दिलासा मिळू लागला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा