जागर न्यूज : पंढरीतील पंधरा वर्षे वयाच्या सुपुत्राने इंग्लिश खाडी पार करून पंढरीच्या लौकिकात मोठी भर घातली असून सातासमुद्रापल्याड पंढरीचा झेंडा या सहिष्णू याने फडकवला आहे त्यामुळे त्याचे कौतुक होऊ लागले आहे.
इंग्लिश खाडी पोहून जाणे हे एक आव्हान असते आणि कठोर परिश्रमाशिवाय ते शक्य होत नाही परंतु सहिष्णू याने अपार कष्ट करून हे यश मिळवले आहे. मुळचे पंढरपूरचे डॉ. शिवानंद जाधव हे सध्या लंडनमध्ये असून त्यांचा 15 वर्षीय मुलगा सहिष्णू व त्याच्या साथीदारांनी इंग्लिश खाडी पोहून पार करण्याचा भीम पराक्रम केला आहे. जाधव कुटुंबिय मुळचे पंढरपूरचे असून त्यांचे आजोबा ह.भ.प. भाऊसाहेब धोंडोपंत जाधव-भोसेकर हे वारकरी संप्रदायातील आहेत. टाकळी येथे त्यांचे घर असून मोहोळ तालुक्यातील पेनुर येथे वारकरी संप्रदायाचा मठ देखील आहे.
इंग्लिश खाडी ही निसर्गत: अतिशय फसवी आहे. वीजा चमकत पडणारा पाऊस, जेली फिश, डॉल्फिन, सील सारखे मासे, प्रचंड थंड पाणी, यासोबतच अतिशय अनिश्चित लाटांच्या प्रवाहांसाठी आणि सतत बदलणाऱ्या हवामानासाठी ती ओळखली जाते. मोहिमेस प्रारंभ झाल्यानंतर अनेकदा वातावरणात प्रचंड बदल होऊन जलतरणपटूंपुढे मोठे आव्हान उभे राहते. अनेक दशकांपासून जगभरातील जलतरणपटूंच्या शारिरीक क्षमते बरोबर मानसिक सहनशक्तीची परीक्षा या खाडीने घेतली आहे. (Sahishnu of Pandharpur crossed the English bay!) यामुळेच इंग्लिश खाडी पोहून पार करणे जलतरणपटुंचे स्वप्न असते. सहिष्णू जाधवने ही कामगिरी पंधराव्या वर्षीच पार पाडली. यामुळे तरूण जलतरणपटुमध्ये त्याचा समावेश झाला आहे. आजवर केवळ 62 भारतीयांनी इंग्लिश चॅनल यशस्वीरित्या पोहून पार केली आहे.
सहिष्णूचा प्रवास आठ महिन्यांपूर्वी सुरू झाला जेव्हा त्याने हे अवघड आव्हान स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्याचे इंग्लिश प्रशिक्षक निक्की पोप आणि ट्रेसी क्लार्क यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने डोव्हर येथे कठोर प्रशिक्षण घेतले. त्यांच्या संघाने महाकाय इंग्लिश चॅनेलच्या थंडगार पाण्यातून 7 सप्टेंबर रोजी पहाटे 3 वाजता पोहण्यास सुरूवात केली. इंग्लंड ते फ्रांस हे सुमारे 40 किलोमीटरचे अंतर त्यांनी 14 तासांमध्ये पूर्ण केले. समुद्रातील भरती आहोटीमुळे कोणीही कधीही एकाच सरळ रेषेत पोहू शकत नाही तर इंग्रजी एस आकारामध्ये पोहावे लागते. त्यानेही कामगिरी पार पडल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी अगदी मराठमोळ्या पद्धतीने त्याचे औक्षण करून अभिनंदन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा