जागर न्यूज : विठ्ठल मंदिरातील कथित खोट्या दागिन्याबाबत आता हिंदू जनजागरण समिती आक्रमक झाली असून मंदिरातीलच कुणीतरी खरे दागिने लंपास करून खोटे दागिने ठेवले असण्याची शक्यता व्यक्त करीत चौकशीची मागणी केली आहे.
पंढरीच्या विठ्ठल मंदिरातील खोटे दागिने हा वादाचा मुद्दा बनू लागला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नुकतेच यावर एक निवेदन देत मोठी शंका व्यक्त केली आहे. भाविक अशा प्रकारे आपल्या देवाला खोटे दागिने अर्पण करणार नाहीत असा विश्वास व्यक्त करीत चौकशीची मागणी करण्यात आली आहे. त्यानंतर हिंदू जनजागरण समिती देखील याबाबत आक्रमक झाली आहे. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पोते भरून खोटे दागिने सापडल्याचे मंदिरातील अधिकार्यांनी जाहीर केले आहे. यामागे काही भाविक मुद्दामहून असे खोटे दागिने टाकत असल्याचे कारण देण्यात आले आहे. यातून एकप्रकारे मंदिर प्रशासनाने स्वत:चे हात झटकले आहेत. या प्रकरणी मंदिरातीलच कोणीतरी खरे दागिने लंपास करून त्याजागी खोटे दागिने ठेवून दागिन्यांचा अपहार केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकरणाची शासनाने एका उच्चपदस्थ अधिकार्यांकडून सखोल आणि निष्पक्ष चौकशी केली पाहिजे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
याबाबतचे निवेदन समितीच्या शिष्टमंडळाने सोलापूर निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांना दिले. पवार यांनी निवेदन पुढे पाठवले जाईल, असे आश्वासन हिंदु जनजागृती समितीचे राजन बुनगे यांना दिले. निवेदनात म्हटले आहे की, यापूर्वीही मंदिर प्रशासनाच्या कारभारात दानपेटीत जमा होणारे पैसे रोजच्या रोज बँकेत जमा न करता दोन-दोन महिने पोत्यात भरून ठेवणे, हिशेबाच्या वह्या आणि पावती पुस्तके यांच्या वापराच्या नोंदी न ठेवणे, प्रतिवर्षी लाखो रुपयांचा खर्च गोधनाच्या खाद्यासाठी करणे, मात्र दुग्धोत्पादनातून मिळणारे उत्पन्न न दाखवणे, मंदिरातील गोधन कसायांना विकणे, ४८ लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च लेखापरीक्षकांकडून तपासून न घेणे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची इमारत भाडे करारावर घेणे; मात्र या इमारतीचा अपेक्षित असा वापर न झाल्याने २००० ते २०१० या कालावधीत मंदिराला ४७ लाख ९७ हजार ७१६ रुपयांचा तोटा होणे, आदी अनेक प्रकारचे घोटाळे हिंदु जनजागृती समितीने उघड केले आहेत. त्यामुळे पोते भरून खोटे दागिने सापडणे या प्रकरणातही काळेबेरे असू शकते.
जे वारकरी अन् वैष्णवजन शेकडो किमी पायी वारी करतात. ऊन, पाणी, थंडी आदींची पर्वा न करता आपल्या लाडक्या विठूरायाला भेटायला येतात. ते विठूरायाला खोटे दागिणे अर्पण का करतील? हा तर एकप्रकारे भोळ्या-भाबड्या वारकर्यांवर आरोप केल्यासारखेच आहे. (Suspicion of misappropriation of jewels in Vitthal temple, suspicion of Hindu committee) या प्रकरणी नेमके काय षड्यंत्र आहे, याचा शोध घेतला गेला पाहिजे. यामध्ये भाविक सराफाकडून देवासाठी दागिने तयार करून घेतात. तेव्हा सराफाकडून खोटे दागिने दिले जात असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. याचाही सरकारने शोध घ्यायला हवा.
असे पुन्हा कोणाला करता येऊ नये, यासाठी मंदिर प्रशासनाने दागिने अर्पण करताना ते खरे आहेत कि खोटे आहेत, हे लगेच पडताळण्याची व्यवस्था करायला हवी. अशी व्यवस्था अद्याप का निर्माण करण्यात आली नाही. यातून मंदिर प्रशासनाला देवनिधीची किती काळजी आहे हेच दर्शवते. मंदिर सरकारीकरणाचे हे दुष्परिणाम आहेत. मंदिर व्यवस्थापन भक्तांकडे असेल, तर भक्त देवनिधी कधी लुटणार नाहीत. यासाठी मंदिर सरकारीकरण रहित करावे, अशीही मागणी समितीने केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा