जागर न्यूज : राष्ट्रवादीचे बडे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज ईडी ने छापा टाकला असून यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि कोल्हापूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
महाविकास आघाडीच्या एकेका नेत्यावर ईडीच्या कारवाया सुरूच असून नुकतेच राष्ट्रवादीचे बडे नेते अनिल देशमुख हे जामिनावर बाहेर आले आहेत. त्याआधी शिवसेनेचे खासदार संजय राउत यांना जामीन मिळाला परंतु राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांना अजूनही तुरुंगात राहावे लागत आहे. त्यांच्या जामिनाची प्रतीक्षा असतानाच आता ईडी चा ससेमिरा हसन मुश्रीफ यांच्या मागे लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. सकाळी ६ वाजता मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील कागल येथील घरावर ईडीने छापेमारी केली असल्याची माहिती आहे. अचानक छापेमारी केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्यावेळी ईडीने ही छापेमारी केली तेव्हा हसन मुश्रीफ हे घरी नव्हते. मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर ईडीने आयकर विभागासह छापेमारी केल्याचं समजताच परिसरात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली असून ईडी आणि केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली आहे. दुसरीकडे ईडीने मात्र, परिसर सील केला असून आपली छापेमारी सुरू ठेवली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत प्राप्तीकर विभागाचे अधिकारीही असल्याचे समजते. सध्या या अधिकाऱ्यांकडून हसन मुश्रीफ यांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. गडहिंग्लज येथील आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यातील १०० कोटीच्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले होते. याचप्रकरणात ही कारवाई झाल्याचे समजते आहे
किरीट सोमय्या यांनी काही महिन्यांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन मुश्रीफ यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप केले होते. २०२० साली कोणत्याही पद्धतीने पारदर्शक व्यवहार न होता आप्पासाहेब नलावडे साखर कारखाना ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला चालवण्यासाठी दिला गेला. या कंपनीला साखर कारखाना चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता. तरीही या कंपनीला कंत्राट का दिले? हसन मुश्रीफांचे जावई या कंपनीचे मालक असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता.
आजच्या कारवाईनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी पुन्हा संवाद साधला. यावेळी सोमय्या यांनी म्हटले की, हसन मुश्रीफ यांनी ग्रामविकास मंत्री असताना १५०० कोटी रुपयांचे कंत्राट त्यांच्या जावयाच्या बनावट कंपनीला दिले. मी याचे पुरावे दिल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी मुश्रीफांना हे कंत्राट रद्द करण्यास सांगितले. (ED raids on NCP leader Hasan Mushrif's house!) मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी अनेक बनावट कंपन्यांच्या माध्यमातून १५८ कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केला. २०१९ मध्ये धाडी पडल्या होत्या. मंत्री असताना मुश्रीफ यांनी आणखी अफरातफर केली. अशा प्रकारे सोमय्या यांनी आरोप केले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा