जागर न्यूज : राष्ट्रवादी फोडून भाजापासोबत गेलेल्या आणि उप मुख्यमंत्री पद पदरात पाडून घेतलेल्या अजित पवार यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एका नव्या चर्चेला उधाण आले असून या विधानाचा अनेकजण अर्थ शोधत आहेत.
अजित पवार हे स्पष्टवक्ते आहेत पण यावेळी त्यांनी केलेले विधान संदिग्ध आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. अमित शहा यांच्या या दौऱ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या. अजित पवार यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू असतानाच त्यांच्या एका विधानाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. (Political excitement again with Ajit Pawar's statement) उप मुख्यमंत्री अजित पवार हे बारामती दौऱ्यावर असताना एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी केलेल्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. अर्थमंत्री पदावरुन बोलताना अजित पवार यांनी हे विधान केले आहे.
"आज माझ्याकडे अर्थखाते आहे. त्यामुळे आपल्याला झुकतं माप मिळतं. पण, यापुढे अर्थखातं टिकेल की नाही टिकेल, सांगता येत नाही,” असे अजित पवार यावेळी म्हणाले. बारामतीमध्ये एका कार्यक्रमात सहकार संस्था आणि कारखान्यांसंदर्भात बोलताना अजित पवार यांनी हे वक्तव्य केले.या आधी उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असताना अनेक योजनांच्या फाइल्स आमच्यापुढं यायच्या. त्यात कोणत्या गावांची नावे आहेत, हे बघायचं, बारामतीचं नाव नसेल, तर टाकायचं आणि सही करायची. अशा पद्धतीने आपल्याला ४२ कोटी रूपयांचं मॅग्नेटचं काम मिळालं,” असा किस्साही अजित पवार यांनी सांगितला.
अजित पवार हे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही काळापासून सुरु आहेत, अजित पवार यांनी देखील मुख्यमंत्री होण्याची इच्छा लपवून ठेवलेली नाही तर पवार हे मुख्यमंत्री होणायासाठीच भाजप सोबत सत्तेत गेले असल्याचेही अनेक नेत्यांनी या आधीच म्हटले आहे. सत्तेत गेल्यानंतर त्यांनी अर्थखाते घेतले आणि आपल्या समर्थक आमदारांना खुश करण्याचा सपाटा लावला आहे, पण आता हे खाते भविष्यात आपल्याकडे राहील की नाही याबाबत त्यांची शंका व्यक्त केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या वर्षभरापासून अनेक अकल्पित घटना घडत आहेत. त्यामुळे सगळे काही अस्थिर दिसत असतानाच पवार यांनी केलेले हे विधान अनेकांना बुचकळ्यात टाकणारे ठरले आहे. जो तो आपल्या पद्धतिने त्याचा अर्थ काढत आहे. असे असले तरी या विधानामागे नक्कीच काही लपलेले आहे असे अनेकांना वाटू लागले आहे.
अजित पवार यांच्या नाराजीची चर्चा सुरु असतानाच हे विधान आले आहे. त्यात भाजपचे गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्याबाबत केलेले वादग्रस्त वक्तव्य पवार यांना रुचलेले नाही. असे सगळे राजकीय वातावरण असतानाच अजित पवार यांनी हे विधान केले आहे. त्यामुळे राजकारणात छुपी खळबळ उडाल्याचे दिसत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा