जागर न्यूज : पंढरपूर शहर आणि तालुक्यात पुन्हा एकदा चोरट्यांनी डोके वर काढले असून तालुक्यातील कौठाळी येथे भर दुपारी चोरटे घरात घुसले आणि दागिने चोरून पसार झाले आहेत.
चोरट्यांचे प्रताप वाढत असताना नागरिकांनी सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे, पंढरपूर शहरात एकाच रात्री चोरट्यांनी तीन दुकानांना चोरट्यांनी नुकतेच टार्गेट केले होते, या चोरीची चर्चा सुरु असतानाच कौठाळी येथे भर दिवसा कुलूप तोडून चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. घरात कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी भरदुपारी दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातील १ लाख ७१ हजार ५०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना भर दुपारी कौठाळी येथे घडली. औदुंबर जगन्नाथ वाघमारे हे पत्नीसह शेतातील वस्तीवर राहतात. सकाळी १० वाजता महादेव मंदिरात कीर्तन असल्याने त्यासाठी दोघे पती-पत्नी गावात गेले होते. त्यानंतर दुपारी घरी आले असता दरवाजाचे कुलूप तोडलेले, घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले.
तसेच लोखंडी कपाट व पर्त्याची पेटी उचकटून चोरट्यांनी ४५ हजार रूपये किंमतीची एक तोळा सोन्याची बोरमाळ, ४५ हजार रूपये किंमतीचे एक तोळा सोन्याचे मंगळसूत्र, १८ हजार रूपये किंमतीची ४ ग्रॅम सोन्याची दूशी, १३ हजार ५०० रूपये किंमतीची ३ ग्रॅम सोन्याची झुबे व ५० हजार रूपये रोख असा १ लाख ७१ हजार ५०० रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला असल्याचे दिसून आले. याबाबतची फिर्याद वाघमारे यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. भर दुपारी झालेल्या या चोरीची तालुकाभर चर्चा होऊ लागली असून चोरांचे मनोधैर्य किती वाढले आहे, हेच या घटनेवरून दिसून आले आहे.
पंढरपूर शहर आणि तालुक्यात होत असलेल्या चोरीच्या घटना काही केल्या थांबायला तयार नाहीत, तालुक्यात पोलीस ठाण्यांची आणि पोलिसांची संख्या वाढली पण चोरांची संख्या कमी होताना दिसत नाही. पंढरपूर शहराची उपनगरे, तालुक्यातील करकंब परिसर, सुस्ते अशा काही परिसरात तर या आधीही चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. पंढरपूर शहरातील उपनगरात तर चोरांची कायम दहशत मनावार घेवूनच नागरिक रात्री झोपत असतात . बंद असलेल्या घरांना तर निश्चितपणे टार्गेट केले जात आहे. शहरातील दुकाने देखील चोरट्यांच्या नजरेत असतात. कुलूप असलेली घर्रे चोरांना निमंत्रणच देत असून, नागरिकांनी सदैव दक्ष राहण्याची, आणि आपणच आपल्या मालमत्तेचे रक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा