जागर न्यूज : देशात पुन्हा एकदा दोन हजार रुपयांची नोट संकटात आली असून ती आता बदलून घ्यावी लागणार आहे पण एका व्यक्तीला दररोज केवळ दहाच नोटा बदलून घेता येणार आहेत. दोन हजार रुपयांची नोट चलनातून रद्द होत असल्याने पुन्हा एकदा खळबळ उडालेली आहे.
केंद्र सरकार व रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने आता दोन हजारांची नोट चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. २३ मेपासून लोकांना बॅंकेतून नोटा बदलून घेता येणार आहेत. पण, एका व्यक्तीला दररोज केवळ दहा नोटाच बदलून मिळणार आहेत. तुर्तास नोटा बदलून घेण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८.३० वाजता भारताच्या चलनाचे विमुद्रीकरण निर्णय जाहीर केला. चलनातून जुन्या ५०० व एक हजाराच्या नोटा बाद केल्या जातील, असे जाहीर केले. ३० डिसेंबर २०१६ पर्यंतच बँक खात्यात हे चलन भरण्याची मुदत दिली होती.
आता पुन्हा चलनातील दोन हजारांची नोट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, नवीन नोटा आल्यानंतर सर्वच बॅंकांना ‘एटीएम’मधील ड्रॉव्हर बदलावे लागले होते. पूर्वीच्या नोटा आणि नोटाबंदीनंतर आलेल्या नोटांमध्ये खूपच फरक होता. दोन हजारांच्या नोटा सर्रास बाजारात पहायला मिळत नव्हत्या. कोट्यवधींच्या नोटा ना एटीएममध्ये ना व्यवहारात, अशी स्थिती होती. त्यामुळे त्या नोटा नेमक्या गेल्या कोठे, या प्रश्नाचे उत्तर बॅंक अधिकाऱ्यांना मिळतच नव्हते. आता त्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय झाल्याने सोलापूर जिल्ह्यात नेमक्या किती नोटा आहेत, ही बाब समोर येणार आहे.
पावसाळ्याची सुरवात साधारणत: १५ जूननंतर होते. अशावेळी २३ मे ते ३० सप्टेंबर या काळात दोन हजारांच्या नोटा बदलाव्या लागणार आहेत. नोव्हेंबर २०१६ च्या नोटाबंदीप्रमाणे आता नागरिकांची नोटा बदलण्यासाठी गर्दी होणार नाही, याची दक्षता बॅंकांना घ्यावी लागणार आहे. तरीपण, त्या नोटा फारशा नसल्याने पूर्वीसारखी गर्दी होणार नाही, असे बॅंक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. नोटा बदलून देण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. (Decision to cancel two thousand two thousand note from currency) सन २०१६ च्या नोटबंदीनंतर पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेतल्यामुळे लोकांना व्यवहार करण्यासाठी तातडीने दोन हजार रुपयांच्या या नोटा चलनात आणल्या होत्या.
मात्र कालांतराने चलनात इतर नोटा पुरेशा संख्येने आल्यामुळे आता दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्यात आल्या आहेत, असे स्पष्टीकरण रिझर्व बँकेने दिले आहे. चलनात इतर नोटा (दहा रुपयांपासून ते पाचशे रुपयांपर्यंत) पुरेशा संख्येने आल्यामुळे दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई देखील २०१८ नंतर थांबवली होती. यातील बऱ्याचश्या नोटा २०१७ पूर्वी छापल्याने त्यांचे आयुष्यही संपत आले होते. तसेच या नोटा चलनात फार मोठ्या प्रमाणावर वापरल्या जात नव्हत्या, असेही ध्यानात आले होते. त्यामुळे क्लीन नोट पॉलिसीनुसार या नोटा रद्द करण्यात आल्याचे रिझर्व बँकेने म्हटले आहे. लोकांना चांगल्या दर्जाच्या नोटा मिळाव्यात ही रिझर्व बँकेची क्लीन नोट पॉलिसी आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा