जागर न्यूज : पैशासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही असा सज्जड दम आमदार समाधान आवताडे यांनी भरला आहे, यामुळे महावितरण अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
कालच पंढरपूर महावितरणचा एक कर्मचारी पाच हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. महावितरणचे काही कर्मचारी केवळ पैशासाठी वीज ग्राहकांची अडवणूक करीत असल्याच्या तक्रारी नेहमीच्या आहेत पण हे भ्रष्ट कर्मचारी सरळ होत नाहीत. या तक्रारी आमदार समाधान आवताडे यांच्या पर्यंत देखील पोहोचल्या त्यामुळे आवताडे यांनी अधिकाऱ्यांना कडक भाषेत सुनावले आहे. विजेच्या ट्रांसफार्मरसाठी निधी मंजूर असताना शेतकऱ्याकडून पैसे घेतल्याची तक्रार येताच पैसे घेणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्याच्या चौकशी आदेश देवून भविष्यात पैश्यासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर त्याची गय केली जाणार नाही असा दम समाधान आवताडे यांनी दिला.
'आमदार आपल्या दारी' या अभियाना द्वारे तालुक्यातील माचणूर, ब्रह्मपुरी, मुंढेवाडी, रहाटेवाडी, तामदर्डी, तांडोर, सिद्धापूर, बोराळे, अरळी, नंदूर, डोणज, भालेवाडी या गावांना आवताडे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी तक्रारी येताच महावितरण अधिकाऱ्यांना सुनावले आहे. गावभेट दौऱ्यात त्यांच्या समवेत जिल्हा नियोजन सदस्य प्रदीप खांडेकर राजेंद्र सुरवसे,दिगंबर यादव, यांच्यासह प्रांताधिकारी बी. आर माळी, तहसीलदार मदन जाधव, गटविकास अधिकारी शिवाजी पाटील, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता दयासागर दामा कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे, पोलीस निरीक्षक रणजित माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक बापूसाहेब पिंगळे,सहायक निबंधक प्रमोद दुर्गुडे, बाल प्रकल्प अधिकारी जगन्नाथ गारोळे, लघु पाटबंधारे विभाग पारवे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ भिमराव जानकर पुरवठा विभागाचे हनुमंत पाटील,जि.प.व सार्वजनिक बांधकामचे अभियंता, वन विभागाचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
गावातील नेत्यांनी विकास कामांच्या पाठपुराव्याला कमी पडू नका, त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही.या मतदारसंघातील विकास कामांचा अनुशेष भरून काढल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही अशी ग्वाही देत तामदर्डी येथील भिमा नदीवरील बंधारा बांधणीचे काम लवकरच सुरु होणार असल्याचे देखील यावेळी आवताडे यांनी सांगितले.सदर बंधाऱ्याअभावी गेली अनेक वर्षे या भागातील माचणूर, तामदर्डी, अरळी, बोराळे, सिद्धापूर, तांडोर, अरबळी, बेगमपूर, मुंढेवाडी या गावांतील व या नदीच्या पाण्यावर अवलंबून असणारे शेतकरी पावसाळ्यामध्ये पाणी अडविण्यासाठी लोकवर्गणी च्या सहाय्याने मातीचे बांध घालावे लागत होते.पण भविष्यात तशी वेळ येणार नाही.असेही ते म्हणाले.
या वेळी उजनी कालवा निर्मितीसाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित झाल्या आहेत अशा अनेक शेतकऱ्यांचा मोबदला आपणास अद्यापपर्यंत मिळाला नसल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले. (MLA Saadhan Awatade got angry with the officer) यावर आवताडे यांनी प्रांताधिकारी बी. आर. माळी यांना दि. २२ सप्टेंबर रोजी तहसीलदार, भूमी अभिलेख, उजनी कालवा संबंधित अधिकारी व पदाधिकारी आणि लाभार्थी शेतकरी यांची बैठक घेऊन योग्य तो सकारात्मक तोडगा काढून शेतकऱ्यांना मोबदला देण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सुचना केल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा