जागर न्यूज : स्वारगेट - पंढरपूर एस टी थेट रस्ता दुभाजकाला धडकून वाखरीत एक अपघात झाला असून यात बसचे मोठे नुकसान झाले असल्याचे समोर आले आहे तर वाहकासह तीन जण जखमी देखील झाले आहेत. या प्रकरणी बस चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा प्रवास सुरक्षित असल्याचे मानले जात होते. पूर्वी हा प्रवास सुरक्षित होताही परंतु अलीकडे प्रवासी बसचे अनेक अपघात होताना दिसत आहेत. जुन्या मोडकळीस आलेल्या बस वापरल्या जात असल्याने ब्रेक फेल होणे, स्टेअरिंग अडकणे यासह विविध प्रकारे बिघाड होत आहेत आणि प्रवाशांचे प्राण संकटात येत आहेत. दररोज कुठे ना कुठे राज्य परिवहन महामंडळाच्या बसचे छोटे मोठे अपघात होताना दिसत असतानाच आता पंढरपूरजवळ वाखरी येथे बसने रस्ता दुभाजकालाच धडक देवून अपघात केला आहे. (State transport bus accident near Pandharpur) भरधाव वेगात एसटी बस चालवून ब्रीजचे काम सुरू असलेल्या डिव्हायडरला जोराची धडक देऊन एसटी बसचे अडीच लाख रुपयांचे नुकसान केल्याप्रमाणे एसटी चालकाविरुद्ध् वाहकानेच गुन्हा नोंद केला आहे.
स्वारगेट ते पंढरपूर अशी पंढरपूर आगाराचे चालक राजेंद्र गोवर्घन पवार ( वय ५२, रा. अहिल्यानगर, ता. मोहोळ, जि. सोलापुर) एमएच ०६ बी डब्ल्यू ४3४७ या क्रमांकाच्या एसटी बसमध्ये प्रवासी घेऊन सोमवारी सायंकाळी सव्वासात वाजता पंढरपूरकडे निघाले होते. मंगळवारी रात्री एकच्या सुमारास वाखरी शिवारातील शाहीर मळ्याजवळ वाखरी बायपास येथे आले. वावेळी चालक राजेंद्र गोवर्धन पवार यांनी भरधाव वेगात एसटी बस चालवली. यामुळे एसटी बसवरील ताबा सुटून ब्रीजचे काम चालू असलेल्या डिव्हायडरला जोराची धडक बसली. त्यामध्ये वाहक विपुल विजयकुमार राऊत (वय ४०, रा. वेळापूर, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) व एसटी बसमधील महिला प्रवासी स्वप्नाली रमाकांत शेजवाळ (वय 3०, रा. टाकळी रोड पंढरपूर), यांना मार लागला आणि ते जखमी झाले आहेत. या अपघातामध्ये २ लाख ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत चालक राजेंद्र पवार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा