जागर न्यूज : भगीरथ भालके हे खरोखर राष्ट्रवादी सोडून बीआरएस मध्ये दाखल होणार की वरिष्ठ पातळीवरून त्यांना थांबवले जाणार ? या प्रश्नांच्या उत्तराच्या प्रतीक्षेत पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.
राष्ट्रवादीची उमेदवारी मिळणार नाही असे संकेत मिळाल्याने भगीरथ भालके यांनी बीआरएस पक्षाशी हातमिळवणी सुरु केली असून खास विमानाने ते मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या भेटीसाठी गेल्यामुळे ही चर्चा आता अधिक बळ धरू लागली आहे. विठ्ठल परिवारातील प्रमुख नेत्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल असे भालके यांनी सांगितले आहे परंतु राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पातळीवरून काही हालचाली सुरु झाल्या असल्याची कुणकुण देखील लागू लागली आहे. राष्ट्रवादी पक्षाकडून काही तोडगा निघतोय काय याची देखील आता उत्सुकता लागू लागली आहे. भालके यांचे राष्ट्रवादी सोडणे हे राष्ट्रवादीला मोठे नुकसान करणारे ठरणार आहे तर भारतीय जनता पक्षाला याचा मोठा लाभ होणार आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार हे पंढरपूरच्या दौऱ्यावर असताना अभिजीत पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. अभिजीत पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर पंढरपुरातून अभिजीत पाटील यांना विधानसभेची उमेदवारी मिळू शकते असे संकेत शरद पवार यांच्याकडून देण्यात आले होते. मात्र शरद पवार यांच्या सूचक वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके नाराज आहेत.
भगीरथ भालके हे पक्षावर नाराज असून, ते बिआरएस पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. मिळत असलेल्या माहितीप्रमाणे या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी भालके यांच्याशी चर्चा केली आहे. राष्ट्रवादीमधील वरिष्ठांकडून भगीरथ भालके यांना फोन करण्यात आला होता. कोणताही निर्णय घेऊ नका असे वरिष्ठांकडून भालके यांना सांगण्यात आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान सध्या मतदारसंघात घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीर भालके हे आता आपल्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
भारत भालके यांच्या निधनानंतर या तालुक्यात नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झालीये. ती भरून काढण्याचं काम अभिजीत पाटील हे करतील. पुढच्या निवडणुकीला पंढरपूरचा राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर अभिजीत पाटील हे असलं पाहिजे. (Bhagirath Bhalke to leave NCP, attention of constituency) आज तुम्ही अभिजीत यांचं नेतृत्व तयार केलंय आता त्यांच्या पाठिशी उभं राहणं आमचं काम असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे, त्यामुळे एकप्रकारे शरद पवार यांनी अभिजीत पाटलांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तबच केल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र या चर्चेमुळे भगीरथ भालके हे नाराज असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे येत्या काळात नेमके काय घडतेय याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा