जागर न्यूज : जमिनीचे मोजमाप करण्याऐवजी भूमापाकाला पैसे मोजण्याची चटक लागली आणि फुकटचे पैसे मोजण्याच्या नादात, करमाळा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील परिरक्षण भू मापकाला तुरुंगाच्या गज मोजण्याची वेळ आली आहे.
करमाळा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील परिरक्षण भूमापक (वर्ग 3 ) खंडू मारुती रेंगडे याला 2500 रुपयाची लाच स्वीकारताना सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.तक्रारदाराने त्याच्या मोरवड(ता .करमाळा) हद्दीतील जमिनीची मोजणी करून हद्दी निश्चित करणे व हद्दी निश्चित केल्यानंतर त्याची नकाशा प्रिंट काढणे यासाठी तातडीच्या मोजणीसाठी अर्ज केला होता. त्यासाठी आवश्यक असलेली शासकीय 3 हजार रुपये फी चलनाद्वारे भरली होती. यातील तक्रारदार यांनी शासकीय फी चलनाद्वारे भरलेली असताना देखील परिरक्षण भूमापक खंडू रेंगडे याने मोजणी करून हद्द कायम करणे व नकाशा प्रिंट काढण्यासाठी तक्रारदाराकडे तीन हजार रुपयाचे लाचेची मागणी केली. 3000 लाचीची मागणी केल्यानंतर तडजोडी आणती अडीच हजार रुपये लाच देण्याचे निश्चित झाले.
लाच देणे मान्य नसलेल्या तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर यांच्याकडे तक्रार केली. या तक्रारीच्या अनुषंगाने सोमवारी रोजी लाच प्रतिबंधक विभागाने सापळा रचून खंडू रेंगडे यास अडीच हजार रूपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. (Land surveyors caught red-handed while taking bribes) याबाबत करमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई पोलीस उपाधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी, पोलीस अंमलदार प्रमोद पकाले, पोलिस काॅन्टेबल गजानन किणगी, श्याम सुरवसे यांनी केली आहे.
करमाळा भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी प्रत्येक शेतकऱ्याला कोणत्या ना कोणत्या कामासाठी सतत लाच मागत असल्याच्या अनेक तक्रारी कायम येत असतात त्यामुळे भूमी अभिलेख कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्यानंतर नेमके यात कोण सापडले याची उत्सुकता सर्वांनाच लागल्याने कारवाईनंतर या परिसरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. या कारवाईचे जोरदार स्वागत करण्यात येत असून शासकीय कार्यालयीन वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा