जागर न्यूज : म्हैसूर ते सोलापूर पर्यंत धावणारी गोलघुमट एक्स्प्रेस आता पंढरपूरपर्यंत येणार असून दक्षिण भारतात जाणाऱ्या आणि दक्षिण भारतातून दक्षिण काशी पंढरपूरला येणाऱ्या भाविकांचीही चांगली सोय होणार आहे. या गाडीचे नवे वेळापत्रक देखील आता जाहीर करण्यात आले आहे.
दक्षिण भारतातील प्रवाशांना पंढरपूरला येण्यासाठी आणि पंढरपूरच्या प्रवाशांना दक्षिण भारतात जाण्यासाठी आता 'गोल घुमट एक्स्प्रेस' रेल्वे उपलब्ध होत आहे. सध्या मैसूर ते सोलापूर या दरम्यान धावणारी ही रेल्वे येत्या ४ सप्टेंबरपासून पंढरपूरपर्यंत येणार आहे. ही रेल्वे दररोज दुपारी पंढरपूर ते म्हैसूर अशी धावणार आहे. रेल्वेच्या दक्षिण-पश्चिम विभागाच्या वतीने या विस्तारित रेल्वेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मैसूर ते गदग पर्यंत रेल्वेचे वेळापत्रक नियमित असणार आहे. परंतु गदग ते पंढरपूर या दरम्यान रेल्वेच्या धावण्याच्या वेळेत बदल करण्यात आलेला आहे. सध्या ही रेल्वे मैसूर ते सोलापूर अशी सुरू आहे. पंधरा दिवसांपूर्वी या रेल्वे गाडीचा प्रवास पंढरपूरपर्यंत वाढवण्यात आलेला आहे. परंतु, अद्याप या गाडीचे वेळापत्रक जाहीर झाले नव्हते. शुक्रवारी रेल्वेने नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार म्हैसूर (गाडी नंबर १६५३५ ) येथून पंढरपूरसाठी दररोज दुपारी ३.४५ वाजता निघणार असून पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १०.४५ वाजता पोहोचणार आहे. त्यानंतर लगेचच दुपारी एक वाजता ही रेल्वे मैसूरसाठी (गाडी नंबर १६५३६) परत निघणार आहे. दुसऱ्या दिवशी दुपारी २.१० वाजता म्हैसूर येथे ही रेल्वे पोहोचणार असल्याची माहिती दक्षिण पश्चिम रेल्वे - प्रशासनाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे. (Golghumt Express will now reach Pandharpur) दरम्यान, १ ऑक्टोबरपासून या वेळापत्रकात बदल केला जाण्याचीही शक्यता रेल्वेकडून व्यक्त करण्यात आली आहे.तीर्थक्षेत्र पंढरपुरात श्री विठ्ठल-रूक्मिणीच्या दर्शनासाठी दक्षिण भारतातून मोठ्या संख्येने भाविक ये-जा करत असतात. या भाविकांची या नव्या एक्स्प्रेस रेल्वे गाडीमुळे चांगली सोय होणार आहे... याचबरोबर पंढरपुरातून प्रवाशांना दक्षिण भारतात प्रवास करणे सोयीचे होणार आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा