जागर न्यूज : सोलापूर जिल्हाधिकारी यांचा चालक असल्याची चलाखी करीत एका भामट्याने सराफाला मोठा गंडा घातल्याची एक मोठी घटना उघडकीस आली असून भामटा मात्र पसार झाला आहे.
नवीन जिल्हाधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकारी भेटायला आले आहेत, त्यांना अंगठ्या व लॉकेट भेट द्यायच्या असल्याचे सांगून विजयपूर रोडवरील अयाज मकबूल मुल्ला या सराफाला एकाने सव्वासहा तोळ्याला फसवले आहे. या प्रकरणी मुल्ला यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.सात रस्ता परिसरातील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाची टेहाळणी केल्यानंतर तो चोरटा विजयपूर रोडवर आला आणि रिक्षाला हात करून त्यात बसला. प्रवास करताना त्याने रिक्षा चालकाला जवळील सराफ दुकानांबद्दल माहिती विचारली. जुना विजापूर नाका आल्यावर तो संशयित त्याठिकाणी उतरला. मुल्ला यांच्या सराफ दुकानात गेल्यानंतर त्याने ‘मी संदीप वाघमारे, जिल्हाधिकाऱ्यांचा चालक’ असल्याचे सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांसमवेत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक असून त्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी सोन्याच्या अंगठ्या व लॉकेट घालणार असल्याचेही त्या व्यक्तीने सराफाला सांगितले.
त्यानंतर तो सराफाला घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात आला. त्याठिकाणी मुल्ला यांना वेटिंग रूममध्ये बसवले आणि तो व्यक्ती जिल्हाधिकाऱ्यांच्या स्टेनोला भेटला. ‘ते माझे मालक असून त्यांना जिल्हाधिकाऱ्यांना भेटायचे आहे’ असे सांगितले. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांची बैठक सुरु असल्याने नेहमीप्रमाणे स्टेनोंनी मुल्ला यांच्याकडे पाहून ‘तुम्ही थोडावेळ बसा’ असा इशारा केला. तेव्हा तो व्यक्ती खरोखर साहेबांच्या ओळखीचा असल्याचे वाटले.काहीवेळाने तो व्यक्ती मुल्ला यांच्याकडे आला आणि वेगवेगळ्या साईजच्या अंगठ्या व दोन लॉकेट पाहिजेत, तुम्ही त्या साईजचे दागिने घेऊन या म्हणून सांगितले. सराफ मुल्ला तेथून बाहेर पडले आणि दुकानात येऊन त्यांनी सव्वासहा तोळ्याचे दागिने सोबत घेतले. त्यावेळी त्यांना आपली फसवणूक होणार आहे, याची थोडीही कल्पना नव्हती.
दागिने घेऊन यायला मुल्ला यांना उशिर होत असल्याने त्या व्यक्तीने जिल्हाधिकाऱ्यांना काही कामानिमित्त निवेदन घेऊन भेटायला आलेल्या शेतकऱ्याचा मोबाईल घेतला. त्यावरून त्याने मुल्ला यांना कॉल केला आणि ‘लवकर या’ एवढाच निरोप दिला. मुल्ला यांच्या दुकानात १९ साईजची अंगठी नसल्याने त्यांनी शेजारील ओळखीच्या दुकानदाराकडून ती घेतली. त्यामुळे त्यांना विलंब झाला होता. काहीवेळाने मुल्ला जिल्हाधिकारी कार्यालयात पोचले. त्यावेळी ते दागिने घेऊन तो व्यक्ती जिल्हाधिकाऱ्यांकडे जात असल्याचे भासवून तेथून पसार झाला. विशेष म्हणजे त्या व्यक्तीने या चोरीत ना स्वत:चा मोबाईल ना वाहन वापरले. सहायक पोलिस निरीक्षक देशमुख तपास करीत आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘सीसीटीव्ही’मध्ये तो व्यक्ती रिक्षातून विजयपूर रोडने पुढे गेल्याचे पहायला मिळाले. त्यानुसार पोलिसांनी रिक्षा चालकाकडे चौकशी केली. त्यानंतर त्याने ज्या शेतकऱ्याच्या मोबाईलवरून मुल्ला यांना कॉल केला होता. त्याचीही चौकशी केली. परंतु, पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. त्याने बनावट नावाचा वापर करून फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवर नसलेल्या त्या चोरट्याचा ‘सीसीटीव्ही’चा आधार घेऊन पोलिस तपास करीत आहेत. भामट्याच्या या करामतीने अनेकांना धक्का बसला असून त्याची जोरदार चर्चाही सुरु झाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा