जागर न्यूज : तलाठी परीक्षेतील सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला असून सोलापूर जिल्ह्यात परीक्षार्थी संतापले आहेत. मागितले सोलापूर आणि मिळाले मुंबई असा अजब प्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे.
राज्य शासनाच्या महसूल विभागांतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील पदाच्या परीक्षा केंद्रासाठी उमेदवाराने दिलेल्या तीन पर्याय सोडून चौथेच केंद्र दिल्याने उमेदवारांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. राज्य शासनाच्या महसूल विभागांतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील ही मोठी भरती आहे. 4 हजार 644 पदांच्या तलाठी भरतीसाठी तब्बल 10 लाख 41 हजार 713 उमेदवारांनी अर्ज केले आहे. त्यातील पुणे जिल्ह्यात सर्वाधिक तर सर्वात कमी अर्ज वाशीम जिल्ह्यात उमेदवारांनी अर्ज केले. शुल्कापोटी कंपनीकडे १० कोटी रुपयांची रक्कम जमा झाली. एवढी रक्कम जमा होऊन उमेदवाराच्या मागणीप्रमाणे परीक्षा केंद्राचे नियोजन केले नसल्याचे दिसून आले.भूमि अभिलेख कार्यालयातील जमावबंदी आयुक्त आणि संचालक यांच्याकडून राज्यभरातील ३६ जिल्ह्यांमधील विविध केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे.त्यासाठी टीसीएस कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी तीन परीक्षा केंद्राचे पर्याय दिले होते मात्र कंपनीने ते केंद्र न देता चौथीच केंद्र देऊन परीक्षार्थींना त्रास देण्याचा प्रयत्न केला.गेली तीन वर्षे कोरोनामुळे भरती रखडली. त्यामुळे यंदाची भरती निघाल्यानंतर परीक्षेची तयारी केलेल्या उमेदवाराला आशेचा किरण निर्माण झाला.
राज्य आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाची तयारी करणारे उमेदवारही यामध्ये आता मोठ्या प्रमाणावर उतरले असताना त्यामध्ये नको ते परीक्षा केंद्र देऊन परीक्षार्थींना केंद्र शोधणे आणि त्या परीक्षेला जाणे यामध्ये मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे याचा विचार कंपनीने केला नाही. (Recklessness in Talathi recruitment exam) गेल्या अनेक वर्षापासून शासकीय भरती नव्हती. यंदा भरती निघाली म्हणून मी अर्ज केला अर्जामध्ये सोलापूर,पुणे, कोल्हापूर या परीक्षा केंद्राचा पर्याय दिला परंतु मला मुंबई परीक्षा केंद्र मागणी केली नसताना दिल्याने त्या ठिकाणी जाणे व परीक्षा केंद्र शोधणे हे अडचणीचे आहे. असे हेमंत जोशी या परीक्षार्थीने सांगितले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा