BREAKING NEWS
जागर न्यूज : देवदर्शनाला निघालेले असतानाच काळाने घाला घातला असून झालेल्या भीषण अपघातात चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे तर पाच भाविक गंभीर जखमी झाले आहेत.
अलीकडील काळात अपघात आणि मृत्यू ही सामान्य बाब होऊ लागली असून रोज अनेक निरपराध लोकांचे जीव जात असले तरी वेगावर नियंत्रण येताना दिसत नाही. प्रत्येकालाच मोठी घाई झाली असून रस्ते चकाचक करण्यात आले हा देखील एक शाप ठरताना दिसू लागला आहे. आता पुन्हा सातारा जिल्ह्याच्या सुर्याचीवाडीमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. देवदर्शनाला जाताना गाडी झाडावर आदळून झालेल्या अपघातात ४ जण ठार झाले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील सुर्याचीवाडी गावाजवळ भीषण अपघात झाला आहे.साताऱ्याच्या खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली येथील पांडूरंग देशमुख यांच्या मारुती ओमनी गाडीतून कुरोली व बनपुरी येथील काही भाविक लोकरेवाडी येथे श्री संत बाळूमामांच्या दर्शनाला जात होते.
यावेळी खटाव ते मायणी सुर्याचीवाडीजवळ चालकाचा ताबा सुटल्याने ओम्नी गाडी झाडावर आदळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत तिघांचा जागीच तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अपघातात पाच जण जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या उपचार सुरू असून जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, घटनास्थळी लोकांची गर्दी झाली असून परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक व अपघातग्रस्तांचे नातेवाईक यांच्या सहकार्याने पोलीस पुढील कार्यवाही करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा