जागर न्यूज : सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सदाशिवनगर शाखेत चोरट्यांनी मोठी चोरी केली असून बँक फोडण्यापर्यंत मजल गेल्याने पुन्हा एकदा जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहिला आहे. या घटनेने बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
सदाशिवनगर (ता. माळशिरस) येथे असलेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा अज्ञात चोरट्याने सोमवारी रात्री फोडून बँकेतील ५१ लाख रूपये रोख व ग्राहकांच्या पाच लॉकर मधील सोन्याचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. याबाबत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखाधिकारी भारत नामदेव लोढे यांनी माळशिरस पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.
सदाशिवनगर येथे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे. या शाखेच्या कार्यालयाला पाठीमागे असलेल्या दरवाजा अज्ञात चोरट्यांनी तोडून आत प्रवेश करून ऑक्सिजन गॅस कटरचा वापर करून लोखंडी दरवाजे गॅसकटरने कापून आत असलेल्या स्ट्रॉग रूममध्ये प्रवेश केला. त्याठिकाणी असलेले लोखंडी कपाट उचकटून बँकेत असलेली ५१ लाख १६ हजार ४७७ रूपयांची रक्कम लंपास केली. त्याचबरोबर स्ट्रॉग रूममध्ये असलेल्या ७५ लॉकर पैकी सहा लोकर तोडून या लॉकरमध्ये असलेल्या ग्राहकांचे सोने लंपास केले. या सहा लॉकरमध्ये दिपक हिराचंद दीक्षित, जगन्नाथ प्रभाकर रणनवरे, नारायण ज्ञानेश्वर सालगुडे, सुनिता कुंडलिक पालवे, नूर मोहम्मद तांबोळी, संजय सूळ यांचे लोकर तोडण्यात आले व त्यातील ऐवज लंपास करण्यात आला व ७३ नंबरचा लॉकर प्रशांत जम्बो कुमार दोशी यांचा गॅस कटरच्या साह्याने फोडण्याचा प्रयत्न केला, पण ते पूर्ण उघडले गेले नाही.
चोरट्यांनी बँक शाखेत प्रवेश केल्यानंतर लाईट बंद करुन सीसीटीव्हीच्या वायर तोडल्या. त्यामुळे सीसीटीव्ही बंद झाले. या चोरीबाबत बँकेने माळशिरस पोलिसांना कळविल्यानंतर तातडीने सोलापूरहून श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले. श्वान पथकाने बँकेकडून नातेपुतेकडे जाणाऱ्या रोडवर दोन किलोमीटर पर्यंत मग काढला व त्यानंतर त्या ठिकाणी ते घुटमळत राहिले. (Thieves broke into a big bank in Solapur district) या चोरीच्या ठिकाणी सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, उप अधीक्षक हिम्मतरावजाधव व अकलूज येथील पोलीस उपविभागीय अधिकारी सई पाटील यांनी भेट दिली. या चोरीचा पुढील तपास माळशिरस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे करीत आहेत. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा