जागर न्यूज : संपूर्ण राज्यासह सोलापूर जिल्ह्यात महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार असून या सप्ताहात आवश्यक दाखले आणि प्रमाणपत्रांचे वाटप केले जाणार आहे. प्रलंबित प्रकरणे निकालात काढण्याचे काम देखील याच सप्ताहात करण्यात येणार आहे.
महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा तसेच राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ घेता यावा. शासन आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृध्दींगत व्हावा या उद्देशाने महसूल दिनापासून म्हणजे १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे, (Organized Revenue Week in Solapur district) असे निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल प्रशासनाच्या वतीने या सप्ताहसह जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराजस्व अभियानातंर्गत केलेल्या कामाची दखल घेऊन महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचा १ ऑगस्ट रोजी गौरव करण्यात येणार आहे. जमीन महसूल अधिनियम कलम १५५ खालील ई- हक्क पोर्टलवरील प्रलंबित प्रकरणे तलाठयामार्फत निकाली काढणेची कार्यवाही करण्यात येणार आहे. युवा संवाद अंतर्गत २ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांना शैक्षणिक कारणासाठी आवश्यक दाखले व प्रमाणपत्रांचे वितरण केले जाणार आहेत. केंद्र व राज्य शासनाद्वारे देण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती, कार्यक्रमांबाबत माहितीपत्रके शाळा, महाविद्यालयांमध्ये वितरित केले जाणार आहेत. विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अद्ययावत करणेसंदर्भात शाळा, स्वस्त धान्य दुकान, बँक, पोस्ट ऑफीस येथे आधार मशीन्स उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा