जागर न्यूज : सोलापूर जिल्ह्यातील ४७५ टपरी चालकांना पोलिसांनी जोरदार दणका दिला असून शाळेच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्धांची विक्री कराल तर खबरदार ! असा इशाराच पोलीस अधीक्षकांनी दिला आहे.
शाळांच्या परिसरात १०० मीटर अंतरावर सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने कायदा २००३ अंतर्गत बंदी आहे. तरीदेखील शाळांबाहेर खुलेआम मावा, गुटखा विक्री होतो. त्यासंदर्भात पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार बुधवारी) जिल्हाभर विशेष मोहीम राबवून तब्बल ४७५ टपरी चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. (Ban on sale of tobacco products in school premises) ही मोहीम आणखी गतिमान होत असून कारवाई करण्यात मागे राहणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याना देखील कारणे दाखवा नोटीस दिली जाणार आहे, त्यामुळे या मोहिमेला आता अधिक गती मिळण्याची शक्यता आहे.
कोप्टा कायद्यानुसार सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिरातींना प्रतिबंध घालण्यात आला आहे. तसेच व्यापार, वाणिज्य, नियमन आणि उत्पादन व पुरवठा, वितरणावर देखील बंदी घालण्यात आली आहे. विशेषतः शाळांमधील मुलांना व्यसनाची सवय लागू नये या हेतूने शाळांच्या १०० मीटर अंतरात अशा पदार्थांची विक्री करणे गुन्हा आहे. सोलापूर शहरात या नियमांचे उल्लंघन सर्रासपणे आणि राजरोसपणे सुरुच आहे. पण, आता ग्रामीणमध्ये सातत्याने अशी विशेष मोहीम राबवून त्या टपरी चालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक सरदेशपांडे यांनी २५ पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. बुधवार पासून कारवाईची धडाका देखील सुरु झाला आहे.
सर्व पोलिस ठाण्यातील अंमलदारांनी शाळा व त्यांच्या हद्दीतील पान टपऱ्यांवर कारवाई केली. प्रत्येकी २०० रुपयांचा दंड याप्रमाणे एकूण ९० हजार रुपये देखील त्यांच्याकडून वसूल केला. आता शाळा परिसरासह प्रत्येक पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील पानटपऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. अनधिकृतपणे शाळांच्या परिसरात पानटपऱ्या टाकून त्याठिकाणी मावा, गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ, सिगारेटची विक्री करणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी सर्व पोलिस ठाण्यांना दिले आहेत. यापुढे अशी मोहीम त्या त्या तालुक्यात दरमहा राबविली जाणार आहे. त्यावेळी कारवाईत मागे राहिलेल्या पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यास त्याची कारणे द्यावी लागतील, असेही पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा