जागर न्यूज : छत्तीसगडमधील कोळसा खाणी वितरण घोटाळा प्रकरणात दोषी आढळलेले काँग्रेसचे माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा आणि त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा यांना दिल्लीतील विशेष न्यायालयाने चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. त्याच वेळी याच प्रकरणात अडकलेल्या बाकीच्या तीन आरोपींना प्रत्येकी तीन वर्षांचा तुरुंगवास सुनावला आहे.
लोकमत समूहाचे चेअरमन आणि काँग्रेसचे माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा, त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा, जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मनोज कुमार जयस्वाल या 3 आरोपींना छत्तीसगड कोळसा खाणी वाटप प्रकरणात घोटाळा केल्याबद्दल प्रत्येकी 4 वर्षांची शिक्षा तुरुंगवासाची शिक्षा दिल्लीतील विशेष न्यायालयाने सुनावली.त्याचबरोबर माजी कोळसा सचिव एच. सी. गुप्ता आणि दोन वरिष्ठ अधिकारी के. एस. कोफ्रा आणि के. सी. सामरिया यांना या घोटाळ्यात मुख्य आरोपींना मदत केल्याबद्दल प्रत्येकी 3 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
छत्तीसगडमध्ये कोळसा खाणीचे हक्क मिळवण्यात विजय दर्डा, देवेंद्र दर्डा, मनोज कुमार जयस्वाल यांनी अनियमित्ता केली. हे आरोप त्यांच्यावर दिल्ली न्यायालयात सिद्ध झाले. या तिघांनाही दिल्ली न्यायालयाने आधीच दोषी ठरविले होते. (Darda father and son jailed for four years) या सर्वांना न्यायालयाने आज शिक्षा सुनावली. या सर्व दोषींना या शिक्षेविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करण्याचा हक्क अबाधित आहे.
छत्तीसगडच्या कोळसा घोटाळ्यात अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. या प्रकरणात अनेक बडे अधिकारी आणि राजकारण्याशी संबंध असलेले अनेक जण रायपूर तुरुंगात कैद आहेत. यात आयएएस अधिकारी समीर बिश्नोई, सौम्या चौरसिया, मुख्यमंत्र्यांचे उपसचिव, सूर्यकांत तिवारी, कोळसा घोटाळ्यात सिंडिकेट म्हणून काम करणारे सुनील अग्रवाल यांचा समावेश आहे.गेल्या नऊ वर्षात आम्ही देखील अनेक वेदना भोगल्या आहेत, त्यामुळे आमची शिक्षा कमी करण्यात यावी असा युक्तिवाद दर्डाच्या वतीने करण्यात आला होता. विजय दर्डा काँग्रेसकडून राज्यसभेवर खासदार होते. गेल्या पाच दशकांपासून दर्डा कुटुंब राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात सक्रिय आहे. त्यामुळे आजच्या निकालानं..दर्डा कुटुंबियांसमोरची आव्हानं नक्कीच वाढली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा