जागर न्यूज : आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक विठुरायाचे दर्शन घेऊन राज्यातील शेतकरी सुखी राहू दे असे साकडे घातले.
'बळीराजाला कष्टकऱ्याला चांगले दिवस येऊ दे, सुजलाम सुफलाम होऊ दे, पाऊस पडू दे, प्रत्येक राज्यातल्या माणसाला चांगले दिवस यावेत', असे साकडे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठुरायाच्या चरणी घातले. आज आषाढी वारीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्निक विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न झाली. यावेळी बळीराजा कष्टकऱ्याला चांगले दिवस यावेत अशी प्रार्थना मनोभावे केली. या सोबतच सलग दुसऱ्या वर्षी विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय पुजेचा मान मला मिळाला, त्यामुळं मी स्वता:ला भाग्यवान समजतो असे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, प्रत्येक राज्यातल्या माणसाला चांगले दिवस यावेत, बळीराजाला तांगले दिवस यावेत असे साकडे मी विठुरायाच्या चरणी घातले आहे. जनसेवेचा जो वसा माझ्या हाती पांडुरंगाने सोपवला आहे, तो असाच पुढे नेण्याचे बळ मला मिळावे एवढीच इच्छा मनोमन त्याच्याकडे व्यक्त केली. राज्यात नुकतीच पावसाला सुरुवात झाली आहे. यंदाचे पर्जन्यमान समाधानकारक ठरावे आणि राज्यातील बळीराजा सुखी समाधानी व्हावा असे मागणे मी विठुरायाकडे मागितले. मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी मंदिरातील कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार महागाई आणि घर भत्ता मंजूर करण्याची घोषणा देखील केली.
आज आषाढी एकादशी. विठुरायाच्या भक्तीत तल्लीन लाखों वारकरी पंढरीत दाखल झाले असून पहाटेपासून दर्शनासाठी पंढरीत मोठी रांग लागली आहे. (Vitthala, let the farmers of the state be happy) विठु भक्तीत तल्लीन होऊन हजारो किलोमीटरचा पायी प्रवास करून पंढरपुरात आलेल्या लाखो वारकऱ्यांनी चंद्रभागेच्या तीरावर आषाढी एकादशीच्या पहाटे - विठूनामाचा गजर सुरू केला आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक आणि मानाचे वारकरी भाऊसाहेब मोहिनीराज काळे (वय ५६) व त्यांच्या पत्नी मंगल भाऊसाहेब काळे (वय ५२) यांच्या हस्ते विठ्ठलांची शासकीय महापूजा पहाटे २.५७ मिनिटांनी विठ्ठल मंदिरात पार पडली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा