जागर न्यूज : राज्यात आता सर्वच उपचार १०० टक्के मोफत मिळणार असून आरोग्याची ही चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे.
राज्यात राईट टू एज्युकेशनच्या धर्तीवर 'राईट टू हेल्थ' हे धोरण राबवले जाणार असल्याची घोषणा करीत महिनाभरात राज्यभर सर्व उपचार 100 टक्के मोफत दिले जाणार असल्याची ग्वाही आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिली. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. शासकीय रुग्णालयांमध्ये केस पेपर काढणे, तपासणी, औषधोपचार यासाठी नाममात्र शुल्क आकारले जाते. अनावश्यक खर्चाला कात्री लावून त्या निधीचा वापर रुग्णसेवेसाठी करण्याचा निर्णय आरोग्य विभागातर्फे घेण्यात आला असल्याचे ते म्हणाले. महाआरोग्य शिबिरानिमित्त सावंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.'रुग्णालयांमधील केस पेपर, तपासणी, औषधोपचार यातून आरोग्य विभागाकडे साधारणपणे 71 कोटी रुपये महसूल जमा होतो. मात्र, या प्रक्रियेसाठी नियुक्त कर्मचार्यांच्या पगारावर 100 कोटी रुपये खर्च होतो. मूळ प्रक्रिया बंद केल्यास 30 कोटी रुपयांची बचत होणार आहे. तेथील कर्मच़ार्यांची नेमणूक अत्यावश्यक ठिकाणी करण्यात येणार आहे. असेही त्यांनी सांगितले आहे.
राज्यात उपकेंद्रापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाला 'सुपरव्हिजन चार्ज' म्हणून सुमारे ६५० कोटी रुपये दिले जातात. या कामाची जबाबदारी आरोग्य विभागाकडून उचलली जाणार आहे. त्यामुळे साडेसहाशे कोटी रुपयांची बचत होणार आहे. (Now one hundred percent treatment will be free!)स्पेशालिस्ट आणि सुपरस्पेशालिस्ट डॉक्टरांची कमतरता भरुन काढण्यासाठी 'इंटेन्सिव्ह' वाढवले जाणार आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेची मर्यादा आता पाच लाख रुपये करण्यात आली आहे. कॅबिनेटच्या येत्या बैठकीत याबद्दल अंतिम निर्णय घेऊन मंजुरी दिली जाणार आहे. दोन वर्षांपूर्वी गट क आणि ड श्रेणीतील पदांची परीक्षा रद्द करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना याबाबत 20 महिन्यांपासून प्रतीक्षा आहे. परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय आरोग्य विभागातर्फे घेण्यात आला आहे. त्यासाठी टीसीएस कंपनीशी करार झाला आहे. याआधी फी भरलेल्या विद्यार्थ्यांना परत फी भरावी लागणार नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा