जागर न्यूज : आषाढी यात्रेनिमित्त पंढरी गजबजू लागली असून मंदिरे समितीच्या वतीने प्रसादाचे पंधरा लाख लाडू तयार करण्याचे नियोजन करण्यात आले असून लाडू तयार करण्याची प्रक्रिया वेगाने सुरु आहे.
आषाढी यात्रेसाठी संतांच्या पालक्या पंढरीच्या वेशीवर आल्या आहेत, पंढरीकडे येणारे सगळेच रस्ते दिंड्या पताकांनी फुलून गेले आहेत. पंढरीत भक्तीचा महापूर येण्यास सुरुवात झाली असून पंढरीचे अवघे वातावरण बदलू लागले आहे. पंढरी हळूहळू भगवे स्वरूप धारण करू लागली आहे तसे प्रशासन देखील अलर्ट मोडवर आले आहे. भाविकांना कसलाही त्रास होऊ नये, त्यांना सगळ्या सोई सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रशासन परिश्रम घेत आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती देखील तयारीला लागली आहे.आषाढी यात्रेला आलेल्या भाविकांसाठी यंदा १५ लाख प्रसाद लाडू बनवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आषाढी यात्रा जवळ येऊन ठेपल्याने लाडू बनवण्याची लगबग सुरू असून दररोज सुमारे ५० हजार बुंदी लाडू तयार करण्यात येत आहेत. मागील वर्षी प्रसाद लाडू बनविण्याचे काम खासगी ठेकेदाराला देण्यात आले होते. यावर्षी मात्र मंदिर समिती आपल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून प्रसादाचे बुंदी लाडू बनवीत आहे. दिवस व रात्रपाळी मध्ये मिळून सुमारे ८० कर्मचारी लाडू बनवण्याचे काम करीत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून दररोज ५० हजार लाडू बनविण्यात येत आहेत. बुंदी तयार करण्यासाठी २० आचारी, लाडू बनवण्यासाठी ३० महिला कर्मचारी तर लाडू पॅकिंगचे काम ३० महिला कर्मचारी करीत आहेत पर्यावरण पूरक अशा बटर पेपरच्या पिशवीमध्ये लाडू पॅकिंग करण्यात येत आहेत.
लाडू पॅकिंग झाल्यानंतर वाहनाद्वारे ते विठ्ठल मंदिर समितीच्या लाडू केंद्रावर विक्रीसाठी पाठवण्यात येत आहेत. समितीच्या वतीने मंदिर परिसरामध्ये सुमारे तीन ते चार ठिकाणी लाडू विक्रीचे केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या लाडू विक्री केंद्रावर लाडू प्रसाद खरेदी करण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे. प्रसादाचे दोन लाडू वीस रुपयांना दिले जात आहेत. दरम्यान आषाढी यात्रेसाठी मुंबईसह, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या सहा प्रदेशातून गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.यात्रेसाठी सुमारे ५००० गाड्या सोडण्याचे नियोजन एसटी तर्फे करण्यात आले आहे. औरंगाबाद प्रदेशातून १२००, मुंबई ५००, नागपूर १००, पुणे १२००, नाशिक १००० तर अमरावती येथून ७०० अशाप्रकारे यात्रेसाठी विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भिमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बस स्थानकांचे नियोजन करण्यात आले आहे.
दरम्यान,यात्रा काळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय,संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक अशा विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येत आहेत. दिंड्या पालख्या पंढरीत येत आहेत, चंद्रभागेत देखील उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले असल्याने भाविकांची स्नानाची सोय होत आहे. (Crowd of devotees for Pandharpur Ashadhi Yatra)अवघी पंढरी विठ्ठलमय होऊ लागली असून वारकरी, भाविक सुखाचा सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करू लागले आहेत. पावसाला सुरुवात झाल्याने देखील वारकरी सुखावालेले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा